मुलींच्या वसतिगृहातील प्रकार : प्राध्यापक फरार, वरोरा पोलीस मागावर वरोरा : महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात प्राध्यापकाने पेन कॅमेरा लावला होता. या कॅमेऱ्यामध्ये प्राध्यापक स्वत: फोटो सहीत अडकल्याचे प्रकरण मागील काही दिवसांपासून सुरू होते. या घृणास्पद प्रकाराची सर्वच स्तरावरुन निंदा केली जात होती. अखेरीस या प्राध्यापकावर वरोरा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून फरार प्राध्यापकाचा वरोरा पोलीस शोध घेत आहेत.वरोरा शहरालगतच्या आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत एका प्राध्यापकाने आपल्यास महाविद्यालयातील मुलींच्या स्वच्छतागृहात पेन कॅमेरा लावला होता. हा पेन कॅमेरा मुलींच्या हातात लागल्याने तो प्राचार्याकडे सुपूर्द करण्यात आला. या कॅमेऱ्यामध्ये लावणाऱ्या प्राध्यापकाचा फोटो आल्याने संस्थेचा संशय बळावला. संस्थेने प्राध्यापकास तत्काळ राजीनामा देण्यास सांगताच, प्राध्यापकाने स्वत: राजीनामा देवून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सर्वप्रथम ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्याने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली होती. सर्वच स्तरावरुन या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. वरोरा शहर शिवसेनेच्या वतीने प्राध्यापकावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अन्यथा वरोरा शहरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. तर भाजपाच्या वतीने केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना निवेदन देवून प्राध्यापकावर कठोर कारवाईची मागणी केली गेली होती. प्रतीश आत्माराम गंधारे असे प्राध्यापकाचे नाव असून तो विवाहित आहे. वरोरा शहरातील आनंदवन चौक नजीकच्या गजानन नगरमध्ये किरायाने राहत असून तो मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील कुंभा येथील रहिवासी आहे. या प्राध्यापकाचे महाविद्यालयीन शिक्षण व प्रशिक्षण वरोरा शहरातील महाविद्यालयात झाले. प्रारंभी घड्याळी तासिकेने शिकविल्यानंतर नुकताच स्थायी झाला होता. अशा या प्रतिश गंधारे प्राध्यापकावर सहाय्यक निरीक्षक वैशाली ढाले यांच्या तक्रारीवरुन कलम ३५४, ३५४ (फ) (ड) आयटी अॅक्ट ६६ (ई) भादंविने गुन्हा वरोरा पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आला आहे. दरम्यान बुधवारी होणारे शिवसेनेचे आंदोलन स्थगीत करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)
कॅमेरा लावणाऱ्या प्राध्यापकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2016 00:50 IST