मान्यवरांची उपस्थिती : कर्मवीर स्पर्धा पुरस्काराचे वितरणचंद्रपूर : पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासणारे, प्रदीर्घ सेवा देणारे, समाजाचे प्रतिबिंब टिपणारे, अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या सत्यनारायण तिवारी व पद्माकर पांढरे या ज्येष्ठ पत्रकारांचा कर्मवीर मा.सा. कन्नमवार यांच्या नावाने पुरस्कार प्रदान करून शनिवारला भावपूर्ण सत्कार करण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व सन्मान राशी असे या पुरस्काराचे स्वरूप होते. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने स्थानिक पत्रकार संघाच्या सभागृहात माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कर्मवीर स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी ज्येष्ठ पत्रकारांसह स्व. छगनलाल खजांजी स्मृतिप्रीत्यर्थ शुभवार्ता, लोकसेवा व विकास प्रतिष्ठानचा मानवी अभिरूची कथा, इतिहास अभ्यासक अशोकसिंह ठाकूर प्रायोजित वृत्तछायाचित्र, ग्रामीण वार्ता आणि प्रोत्साहन पुरस्काराने वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रसायन, उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे अर्थ, नियोजन, वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ज्येष्ठ पत्रकार राहूल भागवत नागपूर, विधितज्ञ अॅड. असीम सरोदे, सत्कारमूर्ती सत्यनारायण तिवारी, पद्माकर पांढरे, प्रेस क्लबचे सचिव मंगेश खाटीक यांची उपस्थिती होती. संचालन आशिष अंबाडे यांनी केले. यावेळी नागरिक व पत्रकारांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)पत्रकारिता राजकारणाला मार्गदर्शक - अहीरलोकशाही प्रक्रियेला पत्रकारिता जिवंत ठेवण्याचे कार्य करते. त्याचे काम सीसीटीव्ही कॅमेरासारखे असते. लोकशाही व्यवस्थेतील लाभ व हानीचे प्रतिबिंब यातून उमटते. पत्रकारिता राजकारणाला मार्गदर्शन करणारी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यावेळी व्यक्त केले. तत्पूर्वी त्यांचा सत्कार प्रमोद उंदीरवाडे यांनी केला.बातम्यातून राजकीय सुरूवात- मुनगंटीवारलोकशाहीचे चार स्तंभ आहेत. यात पत्रकारितेला अनन्य साधारण महत्त्व आहे. यात आज स्पर्धा निर्माण झाली आहे. पत्रकारिता समाजाचा आरसा म्हणून कार्य करीत आहे. वर्तमान पत्रातील बातम्यांमुळेच माझ्या राजकीय जीवनाची जडणघडण झाल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रसंगी व्यक्त केले.यांचा झाला सत्कार कर्मवीर पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ संपादक सत्यनारायण तिवारी व २० वर्षाच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सेवा देणारे पद्माकर पांढरे यांना सन्मानित करण्यात आले. स्व. छगनलाल खजांजी स्मृतिप्रीत्यर्थ शुभवार्ता पुरस्कार प्रशांत देवतळे, लोकसेवा व विकास प्रतिष्ठानचा मानवी अभिरूची कथा पुरस्कार रूपेश कोकावार, इतिहास अभ्यासक अशोकसिंह ठाकूर प्रायोजित वृत्तछायाचित्र पुरस्कार सचिन वाकडे मूल, ग्रामीण वार्ता पुरस्कार प्रथम अमर बुद्धावार, द्वितीय गोवरीचे लोकमत प्रतिनिधी प्रकाश काळे तर तृतीय पुरस्कार गुरुदास गुरनुले यांना देण्यात आला. प्रोत्साहन पुरस्काराचे मानकरी समीर निमगडे व विरेंद्र (बबलू) रॉय ठरले.
पत्रकारितेच्या क्षेत्रातील सेवाव्रतींचा सत्कार
By admin | Updated: August 3, 2015 00:45 IST