बंदोबस्त करावा : विद्यार्थ्यांनी वाचविले बकरीच्या पिलाचे प्राण राजुरा : शहरातील मुख्य वर्दळीच्या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस बघायला मिळत आहे. ये-जा करणाऱ्या वाटसरुंमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे क्रॉसिंग गेटवर रस्त्यावरील खड्डे बुजविणाऱ्या कामगाराला या कुत्र्यांनी चावा घेतला. त्यानंतर दोन दिवसांनी एका बकरीच्या पिलाला या कुत्र्यांनी आपले लक्ष केले. परंतु बकरीचा पिलावर हल्ला चढविणाऱ्या या पिसाळलेल्या कुत्र्याला शाळेत येणाऱ्या मुलांनी पळवून लावले. राजुरा- तेलंगणा या मार्गावरील शहरातील रेल्वे क्रॉसिंग मार्गालगत अनेक शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वनोद्यान बगीचा तसेच अत्यंत महत्वाची कार्यालये आहेत. हा मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस बघायला मिळत आहे. अशातच आदर्श मराठी प्राथमिक विद्या मंदिर येथील विद्यार्थी साहिल सोनटक्के, बालद झाडे, भावेश रार्चलावार, किसन ताजणे, स्वप्नील मंकलवार हे शाळेत येत असताना कुत्र्यांनी बकरीच्या पिलावर हल्ला चढविला. विद्यार्थ्यांनी हिंमत करीत कुत्र्यांच्या तावडीतून त्या पिलाला सोडविले. इतकेच नाही तर त्या जखमी झालेल्या पिलाला शाळेत आणले व सहाय्यक शिक्षक रुपेश चिडे, संतोष वडस्कर, नवनाथ बुटले यांच्या मदतीने गुरांचा दवाखाना गाठून त्या पिलावर औषधोपचार केले. विद्यार्थ्यांच्या या कृतीचे कौतुक होत आहे. तसेच परिसरातील पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणीही आहे. (शहर प्रतिनिधी)
पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे नागरिकात भीती
By admin | Updated: December 30, 2016 01:29 IST