कोठारी : वनविकास महामंडळ वनप्रकल्प मध्य चांदा विभाग बल्लारपूरअंतर्गत वनक्षेत्रात वने व वन्य जिवांच्या संरक्षणार्थ कठोर उपाययोजना करण्यात आली असून जंगलात बेकायदा, विनापरवाना प्रवेश आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी कन्हारगाव येथे आवक-जावक वाहन व व्यक्तींच्या नोंदी घेण्यासाठी तपासणी नाक्याची सुरूवात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी करण्यात आली आहे.कन्हारगाव, झरण, तोहोगाव व धाबा वनक्षेत्र वनविकास महामंडळाच्या ताब्यात असून ३२ हजार हेक्टर जंगलात मौल्यवान वनसंपदा व वन्यप्राणी मुबलक प्रमाणात आहेत. वन्यजीवांचे व वनसंपदेचे योग्य रक्षण करण्यासाठी विभागीय व्यवस्थापक एम.एस. फारूखी, सहाय्यक व्यवस्थापक प्रफुल्ल वाघ यांच्या मार्गदर्शनात पाणवठ्यांवर निरीक्षण कुठ्या तयार करण्यात आल्या आहेत. वन्य प्राण्यांच्या दैनंदिन हालचालीची नोंद घेण्यात येत आहे. जंगल क्षेत्रात जंगली कामगार तसेच वन कर्मचाऱ्यांव्यतीरिक्त मुक्तसंचार करणाऱ्या व्यक्तींवर महामंडळाची करडी नजर आहे. जंगलात बेकायदेशिर फिरणाऱ्या संशयित व्यक्तिंचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी झरण, कन्हारगाव, तोहोगाव व धाबा वनक्षेत्राच्या जंगलातील मुख्य ठिकाणी तपासणी नाके उभारून चौकीदार तैनात करण्यात आले आहेत.शुक्रवारी १ जानेवारीला सकाळी कन्हारगाव येथे तपासणी नाका व बॅरोट तयार करण्यात आले. सरपंच मंगला मडावी यांच्या हस्ते वनाधिकारी प्रफुल्ल निकोडे, उपसरपंच प्रदीप कुळमेथे, ग्रामसेवक मिलिंद देवगडे, तंमुस अध्यक्ष वसंत मंगाम, वनरक्षक प्रशांत मलांडे, ए.एस. देशमुख, डी.पी. परदेशी, यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या मार्गावरील सर्व वाहनांची नोंद, जंगलात जाण्याचे कारण, नाव, गाव, पत्ता व निघण्याची, जाण्याच्या वेळा नमुद करण्यात येणार आहे. जंगलात बेकायदा प्रवेश करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल करून कारवाई होणार असल्याचे वनाधिकारी निकोडे यांनी सांगीतले. (वार्ताहर)
जंगलात अनधिकृत प्रवेशाला एफडीसीएमची बंदी!
By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST