नांदाफाटा : कोरपना व जिवती तालुक्यातील काही परीक्षा केंद्रावर काप्यांचा सुळसुळाट असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये बुधवारी प्रकाशित होताच सुस्तावलेल्या शिक्षण विभागाला खडवडून जाग आली. यातच परीक्षा सुरू होण्याआधीच पथक दाखल झाल्याने प्रत्येक परीक्षा केंद्रावर कॉपीबहाद्दरांची चांगलीच कोंडी झाली. आता कॉपीमुक्त परीक्षा केंद्राचे चित्र सर्व परीक्षा केंद्रावर बघावयास मिळत आहे.विशेष म्हणजे बऱ्याच परीक्षा केंद्रावर महिलांचे पथकही निगराणी ठेवून असल्याने कुणालाही कॉपी करता येत नसल्याचे दिसून येते. ऐनवेळी पथक दाखल झाल्याने बुधवारी केवळ १२ ते १४ गुणांचा पेपर सोडवून बाहेर पडल्याच्या प्रतिक्रिया परीक्षार्थ्यांमध्ये दिसून येत होत्या. यातच शनिवारी पार पडलेल्या इयत्ता दहावीच्या हिंदी पेपरलाही परिस्थिती अशीच होती. कोरपना तालुक्यात शिक्षण विभागाचे पाच पथके परीक्षा केंद्रावर ठाण मांडून होते. त्यामुळे कॉपीचा कुठलाही प्रकार दिसून येत नव्हता. याआधी कोरपना व जिवती तालुक्यातील अनेक परीक्षा केंद्रावर सोशल मिडियाचा वापर करून उत्तरे पुरविण्याचे प्रकार सुरू असल्याची चर्चा होती. मात्र असा प्रकार कुठेच या दोनही पेपरमध्ये दिसून आला नाही. त्याचबरोबर पथकाची निगरानी असल्याने एकही बाहेरील किंवा अतिरिक्त शालेय कर्मचारी परीक्षा केंद्रावर दिसून आले नाही. या कालावधीत पोलिसांचा बंदोबस्तही दिसून आला.शिक्षण विभागाच्या भरारी पथकामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये मोठी धास्ती शिरली असून परीक्षेच्या काळात बाहेर फिरणारे विद्यार्थी पुस्तक घेऊन अभ्यास करीत असलेले चित्र एकदम दिसू लागले आहे. इयत्ता बारावीचा ९ मार्च रोजी व इयत्ता दहावीचे पेपर पुढे असून अभ्यासाशिवाय पर्याय नसल्याचे सुर विद्यार्थ्यांमध्ये उमटत आहे. राज्य कॉपीमुक्त करण्यासाठी प्रशासन कडक पावले उचलत असताना काही परीक्षा केंद्रावर भरारी पथक कानाडोळा करून निघून जातात तर कुठे ढूंकनही पाहत नाही, अशीही चर्चा आहे. (वार्ताहर)भरारी पथकाच्या येण्याआधी परीक्षा केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांजवळील काप्यांची साधी तपासणी कुणीही करताना दिसत नव्हते. यातच परीक्षार्थ्यांसोबत इतरांचा घोळका परीक्षा केंद्रावर दिसून येत होता. त्यामुळे परीक्षा केंद्राला जत्रेचे रूप आले होते. मात्र भरारी पथकाच्या उपस्थितीमुळे आता खुद्द परीक्षा प्रमुखच विद्यार्थ्यांची तपासणी करताना दिसत आहे तर कुठे मोबाईल, बॅग व पुरस्तकांवर निर्बंध लावण्यात आला आहे.
भरारी पथकाने केली कॉपीबहाद्दरांची दमछाक
By admin | Updated: March 9, 2015 01:33 IST