विजय वडेट्टीवार : गराडी नाल्यावर पाईप टाकण्याचे काम पूर्ण सावली : पावसाच्या लहरीपणामुळे दुष्काळग्रस्त सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात १५ सप्टेंबर पर्यंत गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी मिळणारच, असे अभिवचन सावली-ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिले.गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोलामेंढा तलावात सोडावे, यासाठी आपण तालुक्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता तात्काळ हालचाली सुरू केल्या आणि संबंधित विभागाच्या वतीने गराडी नाल्यावर दिवसरात्र पाईप टाकण्याचे काम करवून घेतले. १५ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचेल, असे आश्वासन त्यांनी दिले.पावसाअभावी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातच नव्हे, तर आसोलामेंढा तलावातही पाण्याचा ठणठणात आहे. हा तलाव पूर्ण भरला तर सावली आणि मूल तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ घेता येईल. मात्र या वर्षीच्या अत्यल्प पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार वडेट्टीवारांनी जलसंधारण विभगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन एक महिन्यापूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. मात्र आसोलामेंढा तलावात पाणी येणार नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरविण्यात येत आहेत. त्या शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कोणत्याही परिस्थितीत १५ सप्टेंबरला शेतकऱ्यांना सिंचनासाठी पााणी मिळेलच, असे अभिवचन दिले. गोसेखुर्द धरणाचे पाणी शेतकऱ्यांना मिळाल्यास अंतिम घटका मोजत असलेल्या पिकांना जीवदान मिळेल, पाण्यासाठी होत असलेली शेतकऱ्यांची धावपळ थांबेल, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला शीतल संगीडवार, संदीप पुण्यपकर, प्रफुल्ल बोम्मनवार, शेतकरी सहकारी राईस मिल सावलीचे अध्यक्ष मोहन गाडेवार, प्रशांत रार्इंचवार, मौसम सुरमवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
गोसेखुर्दचे पाणी शेतकऱ्यांना मिळणारच
By admin | Updated: September 11, 2015 01:22 IST