शेतकरी नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटात भरडला जातो. कधी निसर्गाची अवकृपा तर कधी हातात येणारे पीक वन्यप्राणी भरदिवसा डोळ्यांदेखत उद्ध्वस्त करीत असतात. परंतु वनविभागाने यावर अद्यापही कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही. त्यामुळे दरवर्षी वन्यप्राण्यांकडून शेतीचे अतोनात नुकसान केले जाते. वन्यप्राणी शेतीचे प्रचंड नुकसान करीत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
सध्या पीक फळधारणेवर आले आहे. सोयाबीन पीक कापणीला आले तर कपाशीला बोंडे लागली आहेत. पीक शेतकऱ्यांच्या हातात आले असले तरी अजूनही बहुतांश पीक शेतात आहे. मात्र, वन्यप्राणी भरदिवसा शेतात धिंगाणा घालून पीक उद्ध्वस्त करीत आहेत. वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी आजवर अनेक शेतकऱ्यांनी केली. वनविभागाचे उंबरठे झिजविले. मात्र, अद्यापही वनविभाग यावर ठोस उपाययोजना करू शकला नाही.
बॉक्स
नुकसान भरपाई तोकडी
शेतकरी उसणवारी व कर्ज काढून शेतीवर मोठ्या प्रमाणात दरवर्षी खर्च करीत असतात. मात्र, वन्यप्राणी पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. नुकसान भरपाई म्हणून शासन शेतकऱ्यांना नाममात्र भरपाई देऊन मोकळे होते. नुकसान लाखाचे आणि मदत हजारात अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे.
बॉक्स
वाघामुळे जागलीही बंद
शेतशिवारात वाघाचे हल्ले वाढत आहेत. रात्रीच्या सुमारास हे वाघ, बिबटे,अस्वल हे हिंस्र प्राणी सक्रिय होतात. त्यामुळे रात्री पिकांची रखवाली करण्यासाठी जागल करणेही शेतकऱ्यांनी बंद केले आहे.