कंत्राटदाराचा हलगर्जीपणा : सामूहिक आत्मदहनाचा इशारावाढोणा : येथून जवळच असलेल्या आकापूर येथील पिसाराम पा. भाकरे, रामचंद्र वलके, विलास भाकरे व इतर सात शेतकऱ्यांनी विद्युत जोडणीसाठी १४ एप्रिल २०१४ ला विद्युत कार्यालयामध्ये अर्ज दाखल केला. आवश्यक कागदपत्राची पूर्तता केली. मात्र दोन वर्षाचा कालावधी लोटूनही विद्युत जोडणीचे काम पूर्ण झाले नाही. विद्युत जोडणीअभावी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे.विद्युत जोडणीचे काम महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीकडून मे. पोहेकर अॅन्ड सन्स या कंत्राटदाराला देण्यात आले. काम पूर्ण करण्याचा अवधी २६ एप्रिल २०१६ पर्यंत होता. परंतु कालावधी पूर्ण होऊनही काम पूर्ण करण्यात आले नाही. फक्त विद्युत ट्रान्सफार्मर बसवून शेतामध्ये खांब उभे करण्यात आले व अर्धवट काम सोडून कंत्राटदाराने पळ काढला.पीडित शेतकऱ्यांनी वारंवार विद्युत कार्यालय सावरगाव तसेच नागभीड येथे जाऊन कामाबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तरे मिळाली. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांकडून या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनासुद्धा लेखी निवेदन देण्यात आले. परंतु त्यांच्याकडूनही काहीही प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे पीडित शेतकऱ्यांनी जून अखेरपर्यंत विद्युत विभाग व कंत्राटदार यांच्याकडून काम पूर्ण झाले नाही तर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा पीडित शेतकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)
आकापूर येथील शेतकरी विद्युत जोडणीपासून वंचित
By admin | Updated: June 26, 2016 00:44 IST