पोंभुर्णा : सततच्या नापिकीमुळे आणि यावर्षीच्या दुष्काळसदृश परिस्थितीने शेतकऱ्यांसमोर चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात गोधन विकायला काढले आहे.तालुका परिसरामध्ये यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने धानपिक गर्भातच असताना शेवटचे पाणी न मिळाल्याने पुरते नष्ट झाले, तर काहींचे पीक तग धरून असताना पुन्हा निसर्गाची वक्रदृष्टी होऊन अकाली पाऊस पडला. तणसाचे ढिगारे तयार करण्यास उशीर झाल्याने उघड्या तणसामध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे तणस सडून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर गुरांना चारा देण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.वर्षभर शेतीत राब-राब राबून शेती उत्पादन खर्चासाठी बँक, सहकारी संस्था, बचत गट यांच्याकडून कर्जाची उचल करण्यात आली. त्या कर्जाची पूर्तता करण्यासाठी शेतकरी आर्थिक अडचणीत असताना आता पुन्हा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने गुरा-ढोरांना कुठून चारा आणायचे या विवंचनेत बळीराजा सापडला आहे. त्यामुळे त्याचे पुरते कंबरडे मोडल्यागत स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना तटस्थ राहण्यासाठी व त्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पोंभुर्णा तालुक्यात चारा डेपोची व्यवस्था करण्यात यावी अन्यथा गुरांना कवडीमोल भावात दुसऱ्याला विकल्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी स्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)
पोंभुर्णा तालुक्यात चाऱ्याचा प्रश्न गंभीर
By admin | Updated: January 25, 2015 23:11 IST