वरोरा : नवी दिल्ली-चैन्नई रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड ईक्युपमेंटमध्ये कोंढा गावानजीक मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास अचानक बिघाड आल्याने दोन रेल्वे प्रवाशी एक्सप्रेस व एक पॅसेंजर रेल्वे तब्बल तीन तास उशीराने धावल्या. अचानक आलेल्या बिघाडामुळे रेल्वे प्रशासनाची मात्र, मोठी तारांबळ उडाली.१५०१५ या क्रमांकाची गोरखपुर एक्सप्रेस माजरी रेल्वे जक्शनच्या कोंढा गावाजवळून सकाळी ८ वाजताच्या सुमारास जात असताना (ओएचई) ओव्हरहेड ईक्युपमेंटमध्ये बिघाड निर्माण झाल्याने गोरखपुर एक्सप्रेस संथ होवून काही अंतरावर जावून थांबली. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तत्काळ धावपळ करीत एका तांत्रिक पथकाने घटनास्थळ गाठून ओव्हरहेड ईक्युपमेंट दुरुस्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या. तीन तासानंतर प्रशासनास यश आल्यानंतर तीन तास चाळीस मिनीटे थांबलेली गोरखपुर एक्सप्रेस पुढील प्रवासाकरीता रवाना करण्यात आली. गोरखपुर एक्सप्रेस रेल्वे रुळावर थांबवून असल्याने २२८४५ या क्रमांकाची अहिल्या एक्स्प्रेसही मध्ये थांबविण्यात आल्याने अहल्या एक्स्प्रेसही दोन तास चाळीस मिनिटे उशिरा पुढील प्रवासाकरिता निघाली. त्या मागून येणारी ५११३५ या क्रमांकाची बल्लारपूर पॅसेंजर वरोरा रेल्वे स्थानकावर एक तास थांबवून ठेवण्यात आली होती. अनेक रेल्वे प्रवाशांनी पॅसेंजर सोडून बसने पुढील प्रवास केला. त्यामुळे रेल्वेच्या तांत्रिक बिघाडाचा फटका आज अनेक प्रवाशांना सहन करावा लागला. रेल्वेचे टिकीट काढून प्रवासादरम्यान बिघाड आणि त्यानंतर बसने प्रवास करावे लागल्याने अनेक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभाराप्रति तिव्र असंतोष व्यक्त केला. प्रवाशांना सहन करावा लागलेल्या प्रकरणाबद्दल रेल्वेच्या नागपूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ओव्हरहेड ईक्युपमेंटमध्ये बिघाड आला होता. ही बाब अत्यंत दुर्मीळ आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी मात्र, त्यांनी आपले नाव प्रकाशित न करण्याची विनंती केली. (तालुका प्रतिनिधी)
ओव्हरहेड ईक्युपमेंटमध्ये बिघाड रेल्वेगाड्यांना तीन तास उशीर
By admin | Updated: November 4, 2014 22:38 IST