राजुरा : शेकडो वर्षापूर्वीचा वैभवशाली प्राचीन वारसा नाणे प्रदर्शनाच्या निमित्ताने अनुभवायला मिळाला. इतिहासात शिकताना नाण्याचा उल्लेख होतो. मात्र प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी प्रथमच राजुरावासीयांना मिळाली आहे. हे प्रदर्शन प्रत्येकांनी पाहावी, ऐतिहासिक व प्राचीन कालखंडातील नाणे, डाक तिकीटे, देशी-विदेशी चलनाचे अनुभव समृद्ध करणारे आहे. त्यामुळे वैभवशाली प्राचीन वारसा जागृत करणारे प्रदर्शन असल्याचे प्रतिपादन माजी आमदार सुभाष धोटे यांनी केले. राजुरा येथे आयोजित नाणे प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते.चंद्रपूर मुद्रा परिषद, नाणे प्रदर्शन समिती राजुरा व नगर परिषद राजुरा यांच्या सहकार्याने तीन दिवसीय नाणे व ऐतिहासिक डाक तिकीटे प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. पहिल्याच दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकात उत्साह होता. शेकडो विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव होते तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष मंगला आत्राम, उपनगराध्यक्ष अरुण धोटे, विरोधी पक्षनेते प्राचार्य अनिल ठाकुरवार, आरोग्य सभापती सखावत अली, मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.उमाकांत धोटे, चंद्रपूर मुद्रा परिषदेचे अध्यक्ष आर.एम. सकलेजा, सचिव चौधरी, राजुरा नाणे प्रदर्शनी समितीचे मुख्य संयोजक बादल बेले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.१५० वर्षापूर्वीचा ताला प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला होता. मान्यवरांच्या हस्ते तो चाबीने खोलण्यात आला व प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन रूपेश चिडे यांनी केले. प्रास्ताविक आर.एम. सकलेजा यांनी तर आभार आनंद चलाख यांनी मानले. आयोजनासाठी बादल बेले, हरबा पेंदाम, आनंद सागोळे, सागर भटपल्लीवार, पारस सागोळे, बंडू बोढे, आनंद चलाख, रूपेश चिडे, विनोद बोढे, मेश्राम, मडावी यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
वैभवशाली प्राचीन वारसा जागृत करणारे प्रदर्शन
By admin | Updated: December 14, 2015 01:17 IST