तगडा पोलीस बंदोबस्त: जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षकांनी घेतला आढावा चंद्रपूर : १0 एप्रिलला लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रीया पार पडली. त्यानंतर उद्या १६ मे रोजी मतमोजणी केली जाणार असून या निवडणुकीत कोण विजयी होईल, याबाबतची नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दरम्यान, मतमोजणीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. आज सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, निवडणूक निरीक्षक एस.के.दास व जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांनी आढावा घेत संबंधित अधिकार्यांना बंदोबस्तासंदर्भात मार्गदर्शन केले. बसस्थानकासमोरील उद्योग भवनात मतमोजणी होणार आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजता स्ट्रॉंग रुम उघडण्यात आल्यानंतर ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ होईल. मतदानाच्या तब्बल एक महिना सहा दिवसानंतर मतमोजणी होत असल्याने मतदारांमध्ये निकालाबाबत उत्सुकता होती. आता निकालाला अवघे काही तास शिल्लक असल्याने प्रमुख पक्षातील उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदार संघात भाजपाचे हंसराज अहीर, ‘आप’चे वामनराव चटप व कॉंग्रेसचे संजय देवतळे यांच्यात तिहेरी लढत झाली. मात्र आता निकालाअंती निवडणुकीत कोण बाजी मारतो, याकडे सार्यांचेच लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
निकालाची उत्सुकता शिगेला
By admin | Updated: May 15, 2014 23:22 IST