चंद्रपूर: शासनाने लादलेल्या शैक्षणिक पात्रता अटींच्या विरोधात जिल्ह्यातील कृषी केंद्र संचालकांनी मंगळवारी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून शासनाच्या या अटीचा विरोध नोंदविला. कृषी केंद्र संचालकांनी पदवीधर (बीएससी अॅग्री वा रसायनशास्त्र) असणे आवश्यक असल्याचा नवा आदेश शासनाने नुकताच काढला. जे पदवीधर नाहीत, त्यांनी दोन वर्षांत पदवीचे शिक्षण घ्यावे, असेही या आदेशात म्हटले आहे. नव्याने पदवी घेणे आता शक्य नाही, त्यामुळे ही अट रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी चंद्रपूर डिस्ट्रीक्ट अॅग्रो डिलर्स असोसिएशनच्या नेतृत्वात जिल्ह्यातील कृषी संचालकांनी मंगळवारी एक दिवसाचा बंद पुकारला होता. मंगळवारी दुपारी चंद्रपूर जिल्हा कृषी विक्रेता संघाचे अध्यक्ष शिवनारायण सारडा यांच्या नेतृत्वात येथील जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष दीपक उराडे, प्रशांत गुंडावार, सचिव अभिजीत खटी यांच्यासह कृषी केंद्र संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा चंद्रपूर जिल्हा कृषी विक्रेता संघाने केला आहे. बल्लारपूर येथे तहसीलदार जाधव डी.जी.जाधव यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात पराग टिंबडिया, राजू निखाडे, रामचंद्र थेरे, राजू ठोंबरे, कवडू बुटले, चंद्रकांत नरहरशेट्टीवार, श्याम नंदगिरवार, राजू वांढरे, दुधनाथ दुधबळे आदींचा समावेश होता. सिंदेवाही येथे तालुका कृषी विक्रेता संघाचे अध्यक्ष राजू धामेजा, उपाध्यक्ष अनिल बोरकर, सचिव रमेश महाजन यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. चिमूर तालुका कृषी विक्रेता संघाच्यावतीने प्रदीप बंडे, वसंत वानखेडे, महेश बजाज, किशोर मुळेवार, अविनाश डोये यांनी निवेदन दिले.(प्रतिनिधी)
कृषी केंद्र संचालकांच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2016 00:52 IST