बल्लारपूर : शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी येथील गुरुनानक पब्लिक स्कूलच्या वतीने शाळेत "अटल टिकरिंग लॅब"ची व्यवस्था करण्यात आली. या लॅबचे उद्घाटन २० मार्चला बीआयटी इंजिनिअरिंग कॉलेजचे व्यवस्थापक संजय वासाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
उदघाटन सोहळ्यात शाळेचे व्यवस्थापक कैलास खंडेलवाल यांनी अटल लॅबचा शाळेतील विद्यार्थ्यांना कसा फायदा होतो, याची माहिती सांगितली. यावेळी शाळेतील विद्यार्थिनी यशस्विनी अन्नम व सना शेख यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या मदतीने लॅबचा उपयोग, महत्त्व व उद्दिष्टे उपस्थितांना समजावून सांगितली व दहावीच्या विद्यार्थ्यांनी थ्री डायमेंशन चित्र मॉडेलच्या साहाय्याने कसे रेखाटता येईल, हे करून दाखवले. तसेच रोबोटच्या साहाय्याने पाहुण्यांना पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी संजय वासाडे यांनी नवीन तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन लक्ष्मी अन्नम यांनी केले. कार्यक्रमात शिवज्योती येलगमवार, फरीन शेख, शाळेच्या मुख्याध्यापिका रूमाना शेख, प्राचार्य दिलीप शहा, तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती.