वरोरा : तालुक्यातील जामगाव नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेती आहे. या घाटाचा लिलाव झाला नसल्याने मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी केली जात असल्याची माहिती खनिकर्म विभाग चंद्रपूरला मिळाली. माहितीच्या आधारे आज शनिवारी सकाळी ९ वाजता धाड टाकून दोन रेती भरलेले ट्रॅक्टर जप्त करून वरोरा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.शासकीय किंमत अधिक असल्याने त्या रेती घाटाचा लिलाव झाला नाही. लिलाव झाला नसलेल्या रेती घाटावर मागील काही महिन्यांपासून रेती माफीया मोठ्या प्रमाणात सक्रीय होऊन रेतीची चोरी रात्रंदिवस करीत होते. रेतीच्या वाहतुकीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. यामध्ये शासनाचा महसूलही मोठ्या प्रमाणात बुडत होता. रेती चोरट्यांना आळा घालण्याकरिता स्थानिक यंत्रणा अपुरी पडत असल्याने रेती माफीयाचे चांगलेच फावले होते. शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास खनिकर्म विभाग चंद्रपूरच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वरोरा तालुक्यातील जामगाव रेती घाटावर अचानक धाड घातली. त्यात एमएच ४० ए ५७१ व एमपी २८ एए ८६९० या क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर घाटावरच पकडण्यात आले. यात रेती भरून आढळली. ते दोन्ही ट्रॅक्टर खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यामध्ये जमा केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
जामगाव घाटावर रेतीचे उत्खनन
By admin | Updated: February 15, 2015 00:41 IST