चंद्रपूर : कोरोना साथरोगाने अवघे मानवी जीवन धास्तावले; मात्र आधुनिक वैद्यकीय विज्ञानामुळे वर्षभरातच प्रतिबंधक लस शोधण्यास संशोधकांना यश आले. त्यामुळे लसीकरणालाही सुरुवात झाली. जिल्ह्यात नोंदणीकृत आरोग्य कर्मचारी व फ्रन्ट लाइन वर्कर लस घेत आहेत; पण लसीकरणाला अजूनही मोठी गती आली नाही. त्यामुळे सर्वांना कोरोना लस मिळण्यास वर्षभराची वाट पाहावी लागणार काय, असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
लसीकरणासाठी जिल्ह्यात २६ हजार १४१ कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी १७ हजार ३४१ तर ८ हजार ८०० फ्रन्ट लाइन वर्कर्सचा समावेश आहे. १६ जानेवारीला ही मोहीम सुरू करताना प्रारंभी लसीकरण केंद्रांची संख्या मर्यादीत ठेवण्यात आली होती. त्यानंतर संख्या वाढण्यात आली. चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत चार केंद्रांचा विस्तार करण्यात आला. आता तर जिल्ह्यातील १७ केंद्रांमध्ये लसीकरण सुरू आहे. नऊ केंद्रांमध्ये लस घेणाऱ्यांची संख्या सुमारे एक हजाराहून जास्त झाली. यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असून, फ्रन्ट लाइन वर्कर्स मात्र मागे राहिले आहेत. हीच गती कायम राहिल्यास सर्व वयोगटातील नागरिकांना लस घेण्यासाठी वर्षभर प्रतीक्षा करावी लागणार काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
जिल्ह्याला १३ हजार ३०० डोस उपलब्ध
१६ जानेवारीला लसीकरण सुरू झाल्यानंतर मागील आठवड्यात २८ दिवस पूर्ण झाले. पहिला डोस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देणे सुरू झाला. त्यासाठी जिल्ह्याला १३ हजार ३०० डोस उपलब्ध झाले. लस घेण्यासाठी आरोग्य कर्मचारीच पुढे आहेत; मात्र अन्य विभागातील एफएलडब्लू म्हणजे फ्रन्ट लाइन वर्कर कचरत आहेत. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होऊ शकते. तोपर्यंत ५० वयोगटाच्या आतील व्यक्तींना प्रतीक्षाच लागणार आहे.
दहा दिवसात ५७ कोरोना रुग्ण
जानेवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होती; परंतु या महिन्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात अॅक्टिव रुग्णांची संख्या ८३ झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गुरुवारपासून सामूहिक कार्यक्रमांवर निर्बंध लादले आहेत. जिल्हा प्रशासनाची परवानगी घेऊन केवळ १०० व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.