राजकुमार चुनारकर खडसंगीभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष राज्यात समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या ऐतिहासिक वर्षाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या धर्तीवरच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात स्मार्ट दलित गावांची निर्मिती करण्यात येणार आहे.केंद्र शासनाने शहराच्या विकासासाठी ‘स्मार्ट सिटी’ ही योजना राबविली. याच धर्तीवर राज्य शासन स्मार्ट ग्राम योजना राबविणार आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायतींना सक्षम आणि स्मार्ट बनवून ग्राम विकासाच्या चळवळीला गतिमान करण्याचा प्रयत्न चालविला आहे. ग्रामविकास विभागामार्फत गावाच्या विकासासाठी सध्या विविध योजना राबविल्या जात आहेत. या विविध योजनांचे एकत्रीकरण करून तसेच शासनाच्या विविध विभागाचा समन्वय साधून स्मार्ट ग्राम योजना राबविण्यात येत आहे. त्याचाच धागा पकडून आता राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यातील एका दलित गावाला स्मार्ट बनविणार आहे.१४ एप्रील २०१५ ते १४ एप्रिल २०१६ हे वर्ष समता व सामाजिक न्यायवर्ष म्हणून साजरे करण्यात येत असून या निमित्त विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. यासह सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सर्वाधिक दलित लोकसंख्या असलेले एक गाव निवडून ते ‘स्मार्ट’ गाव म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या गावात वीज, पाणी, रस्ते या सारख्या पायाभूत सुविधा तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सर्व सेवामुळे अनेक वर्षापासून विकासापासून वंचित राहिलेल्या दलित गावाचा कायापालट होऊन या गावात मूलभूत सुविधासह आधुनिक सुविधासुद्धा पुरविल्यामुळे या गावाचा सर्वांगिण विकास होऊन ते गाव जिल्ह्यात स्मार्ट बनणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील दलित गाव होणार ‘स्मार्ट’ !
By admin | Updated: September 14, 2015 00:49 IST