घुग्घुस: येथील गावाच्या मध्यभागी निस्तार हक्काचा खासगी तलाव मागील अनेक वर्षापासून स्वच्छ करण्यात न आल्याने घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे जलप्रदूषणाची समस्या निर्माण झाली होती. त्यातून नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले होते. गावकऱ्यांकडून सदर तलावाची साफसफाई व खोलिकरण करण्याची मागणी सातत्याने केल्याने ग्रामपंचायत व जि.प. बांधकाम व शिक्षण सभापती देवराव भोंगळे यांच्या पुढाकाराने तलाव खोलिकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.गावाच्या मध्यभागी असलेले खासगी मालगुजार तलावावर लोकांचा निस्तार हक्क आहे. त्या तलावात दरवर्षी महिला गौरी पूजन, गणपती, दुर्गा व शारदा विसर्जन करतात. गेल्या अनेक वर्षापासून या तलावाची साफसफाई न झाल्याने तलावात घाण पाणी साचले होते. जल प्रदूषणापासून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. नागरिकांना नाईलाजाने या ठिकाणी धार्मिक विधी करावा लागत होता. दरम्यान, सदर तलावाची साफसफाई व सौंदरीकरणाची मागणी वारंवार करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे करण्यात आली. वारंवार ग्रामसभेतून केल्या जात होती. मात्र ग्रामपंचायतीकडून काही अडचणी समोर येत होत्या. मात्र उशिरा का होईना उपसरपंच निरीक्षण तांड्रा यांनी या कामात लक्ष घातले. जिल्हा परिषदेचे बांधकाम व शिक्षण सभापती देवराव भोंगळे यांच्या सहकार्याने बुधवारपासून तलाव खोलीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. पाऊस येण्यापूर्वी काम पूर्ण व्हावे यासाठी दोन जेसीपी डोझरच्या माध्यमातून आणि ट्रॅक्टर लाऊन खोदण्यात आलेल्या मातीपासून तलावाच्या सभोवताल मोठी पार तयार करण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर करण्यात येत आहे. उशिरा का होईना मात्र तलाव खोलिकरणामुळे पावसाचे पाणी साचून बाराही महिने पाणी राहील जमिनीच्या भूगर्भातील पाण्याची पातळी वाढणार आहे. (वार्ताहर)
अखेर ‘त्या’ तलावाच्या खोलीकरणाला प्रारंभ
By admin | Updated: May 23, 2015 01:31 IST