चंद्रपूर : शहरातील ऐतिहासिक रामाळा तलाव प्रदूषणमुक्त व सौंदर्यीकरण करण्यासाठी उद्योजकांनी सामाजिक बांधीलकी अंतर्गत (सीएसआर) पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सोमवारी सीएसआर प्रमुखांच्या बैठकीत केले.
रामाळा तलावातील गाळ काढणे, एसटीपी बसविणे, रिटेनिंग वॉलचे काम व पूल बांधण्याच्या प्रस्ताव शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सामाजिक बांधीलकी अंतर्गत उद्योजक कंपन्यांनी निधीची व्यवस्था करावी किंवा मशीनरी उपलब्ध करून दिल्यास रामाळा तलाव प्रदूषणमुक्त होण्यास मोठी मदत मिळेल, याकडे जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी लक्ष वेधले. सात दिवसात सर्व उद्योजक प्रमुखांनी आपआपल्या सहकार्याच्या स्वरूपाची माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्या कार्यालयास कळवावे. उद्योजकांचे योगदान कशाप्रकारे प्राप्त होईल याबाबत पुन्हा एकदा आढावा बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे श्याम काळे, उपकार्यकारी अभियंता पाटबंधारे (यांत्रिकी) बिसने, इको-प्रोचे प्रतिनिधी व प्रमुख उद्योजक उपस्थित होते.