गोंडपिंपरी शहर : पानटपरी मालकांनी स्वत: हटविले अतिक्रमण गोंडपिंपरी : गोंडपिंपरी शहर हे बल्लारपूर-आष्टी राज्यमार्गावर वसले आहे. राज्यमार्ग ३६७ अंतर्गत येणाऱ्या मार्गावर व्यावसायिकांनी आपल्या दुकानाच्या समोर शेड थाटून अतिक्रमण केलेले होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यालगत असलेल्या व्यावसायीकांना नोटीस बजावल्याने पानठपरी चालक आपापले ठेले हलवित आहेत. गोंडपिंपरी शहरात मागील अनेक वर्षांपासून मुख्य रस्त्याच्या कडेला व्यावसायिकांनी दुकानाच्या समोर शेड थाटले होते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होवून अपघात होण्याची शक्यता बळावली होती. काही बढ्या व्यावसायिकांनी तर चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत शेड थाटून आपली प्रतिष्ठाने थाटली होती. शहरातील जुने बसस्थानक हे मुख्य बाजारपेठ आहे. या जुन्या बसस्थानकाच्या परिसरात चक्क अतिक्रमणधारक टपऱ्या आहेत. जुन्या बसस्थानकाचा बस थांबा येथेच आहे. वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. ओपनस्पेस जागेवर अतिक्रमण करून धनदांडग्यांनी याच परिसरात जागा हडप करून किराया घेत आहेत. यासंदर्भात आॅटो मालक चालक संघटनेने मागील ११ वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे आॅटो संघटनेला उपोषणाला बसावे लागले. ८ आॅगस्टला सार्वजनिक बांधकाम उपविभाग गोंडपिंपरीने ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत मुख्य रस्त्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या दुकान मालकांना नोटीस बजावले. त्यामुळे दुकान मालक धास्तावले आहेत. बांधकाम विभागाने तीन दिवसात आपआपली दुकाने हटविण्यासंदर्भात नोटीसातून ताकीद दिल्याने छोटे लघु व्यवसायीक आज त्यांच्या नोटीसाप्रमाणे शेवटचा दिवस असल्याने ठेले हटविण्यात मग्न होते. (शहर प्रतिनिधी)
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोटीसने अतिक्रमणधारक धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2016 01:16 IST