जितेंद्र लोणारे
: उमेदच्या महिलाना ग्रामपंचायत करणार मदत
मूल: दिवसेंदिवस रोजगाराची समस्या बिकट होत आहे, कोरोना संसर्गामुळे अनेकाचे रोजगार हिरावलेला आहे, यामुळे बचतगटांच्या माध्यमातून महिलांनी पुढे येऊन वेगवेगळे उद्योगधंदे निर्माण करून रोजगार उपलब्ध करावा, असे मत राजोली ग्रामपंचायतचे सरपंच जितेंद्र लोणारे यांनी व्यक्त केले.
ते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने राजोली येथे सोमवारी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एल्गार महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या सदस्या संगीता गरमडे होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायतीचे उपसरपंच गजानन पाटील ठिकरे, ग्रामपंचायत सदस्य सुनील गुज्जनवार, बंटी निकुरे, सविता गुज्जनवार, ग्रामविकास अधिकारी चहारे, राजोली-मारोडा क्षेत्राच्या प्रभाग संघसचिव अल्का उईके, कोषाध्यक्ष लता खोब्रागडे, ग्रामसंघाच्या अध्यक्षा सरिता कुंभारे, कोषाध्यक्ष वर्षा शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
बचतगटाच्या महिलांना उमेद अंतर्गत वेगवेगळे प्रशिक्षण दिल्या जात आहे, त्यामुळे बचतगटांचा हिशेब ठेवण्यात आता महिला परिपक्व होत असल्याने उमेदचे कार्य राजोली-मारोडा क्षेत्रात व्यवस्थित होत असल्याचे मत एल्गार महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या सदस्या संगीता गरमडे यांनी यावेळी व्यक्त केले. प्रास्ताविक बँक सखी हर्षा बारसागडे यांनी केले, संचालन कोमल कुंभारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार हर्षा बारसागडे यांनी मानले.