प्रकाश देवतळेंची मागणी : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षघुग्घुस : घुग्घूस बायपास मार्गाची कामे मागील दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे ही रखडलेली कामे तातडीने करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केली आहे. घुग्घूस शहरातून वणीकडे जाणाऱ्या रहदारीमुळे अपघात घडत आहेत. या ठिकाणी प्रमुख चौकात मोठ्या प्रमाणात ट्रक उभे असतात. येथून जाताना दुचाकी वाहनांचा अपघात होऊन आजवर अनेकजणांचा जीव गेला आहे. अपघात टाळण्यासाठी घुग्घूस बायपास मार्गाची निर्मिती करण्यात आली. या रस्त्याच्या कामाचे कंत्राटदार गुप्ता यांची भेट घेऊन कामांना वेग देण्याची मागणी केली होती. मात्र त्यावरूनही तीन महिने लोटले आहेत अर्धवट सीडी वर्क करून कंत्राटदाराने काम बंद केले आहे. या अर्धवट रस्त्याची गिट्टी उखडली आहे. शासनाने या बायपास रस्त्यासाठी मोठा निधी दिला असताना कंत्राटदार गुप्ता यांनी बांधकाम विभागाकडून काम घेऊन अर्धवट करून मध्येच काम बंद केले. या बायपास रस्त्याची कामे त्वरीत सुरू करावी. १५ दिवसात याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन कंत्राटदाराकडून ही कामे करून घ्यावी अन्यथा घुग्घूस शहर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर अध्यक्ष जावेद सिद्दीकी, गणेश उईके आदींनी दिला आहे. (वार्ताहर)
घुग्घूस बायपासची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करा
By admin | Updated: April 24, 2016 01:03 IST