न्याय कोण देणार ? : १५ दिवसांपासून गाव अंधारात वासेरा : सिंदेवाही तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीतील कारव्हा गाव गेल्या १५ दिवसांपासून अंधारात आहे. येथे चिचपल्ली उपस्टेशनवरून वीज पुरवठा केला जातो. भद्रावती तालुक्यातील राणतळोधी-कोळसा या मार्गावर विद्युत तारेवर झाड कोसळल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून गावाचा विद्युत पुरवठा बंद आहे.कारव्हा हे गाव ६०० लोकसंख्येचे गाव असून जंगलव्याप्त परिसर असल्याने वाघाची दहशत असते. त्यामुळे नागरिकांना केव्हाही श्वापदांचा धोका असतो. विद्युत पुरवठा बंद असल्याने अंधारातच नागरिकांना रात्र काढावे लागत आहे. कारव्हा येथील विद्युत ही चिचपल्ली-कोळसा-राणतळोधी मार्गे कारव्हा अशी असून चिचपल्ली हे चंद्रपूर तालुक्यात येते. तर राणतळोधी हे गाव भद्रावती तालुक्यात तर कारव्हा सिंदेवाही तालुक्यात येते. चिचपल्ली ते कारव्हा मार्गात कुठेही विद्युतमध्ये बिघाड झाल्यास त्या भागातील विद्युत विभागाशी संपर्क करावा लागतो. चिचपल्ली ते कोळसा मार्गात बिघाड झाल्यास चिचपल्ली विभागाचे अधिकारी दुरुस्त करतात तर कोळसा ते राणतळोधी मार्गात बिघाड झाल्यास भद्रावतीचे अधिकारी दुरुस्त करतात. राणतळोधी ते कारव्हा भागात बिघाड झाल्यास सिंदेवाहीचे अधिकारी दुरुस्त करतात. त्यामुळे कुठे बिघाड झाला, आणि दुरूस्ती कोण करणार हा प्रश्न नागरिकांना नेहमी अडचणीचा ठरत आहे. कारव्हा येथील नागरिकांशी चर्चा केली असता, गेल्या १५ दिवसांपासून विद्युत नसल्याने त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले. रात्री गावात बिबट घुसत असून जीवीत हाणी होण्याची शक्यता दर्शवली. तीन तालुक्यात गावाची विद्युत अडकली असल्याने न्याय कुणाला मागायचा असा प्रश्न तयार झाल्याचे मत मांडले. विजेअभावी १५ दिवसांपासून नळ योजना बंद असून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)
तीन तालुक्यात अडकली कारव्हाची वीज सेवा
By admin | Updated: June 20, 2015 02:04 IST