आयुधनिर्माणी (भद्रावती) : वारंवार विनंत्या करूनही आपल्या तक्रारीची कोणत्याही प्रकारे दखल न घेता चुकीचे अवास्तव आलेले विजेचे बिल भरण्यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आपणावर दबाव आणत आहेत. त्यामुळे माझे कुटुंबीय धास्तावलेले असून माझी मनस्थिती खराब झाल्यास विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी जबाबदार असतील, असे सांगत वीज कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रदीप अजाबराव मत्ते या वीज ग्राहकाने दिला आहे.पत्रकार परिषदेत माहिती देताना ते म्हणाले, २०११ पासून वीज वितरण कंपनीकडून आपल्याला सरासरी वीज बिल यायचे. बील नियमीत भरले जात मात्र त्यानंतर बिल येणेच बंद झाले. याबाबत चौकशी केली असता आपणाकडून जास्तीचे पैसे कंपनीकडे भरले असल्यामुळे बिल आले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र तरीही नादुरुस्त मिटर बदलविण्याकरिता कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली नाही. त्यानंतर जानेवारी २०१४ मध्ये ११ हजार बिल पाठविण्यात आले. सहायक अभियंत्याने तुमचे मीटर सुरू असून ते बदलविण्याची गरज नाही, असे सांगितले. मात्र पुन्हा लगेच मीटर बदलविले. त्यानंतर फेब्रुवारी २०१४ मध्ये २३ हजार रुपयाचे बिल आकारण्यात आले. त्यानंतर पुन्हा १२ हजार व १५ हजार बिल पाठविले. बिल भरा अन्यथा वीज कापली जाईल असा इशारा दिल्याचे मत्ते यांनी सांगितले. वीज वितरणच्या इशाऱ्यामुळे आपल्या उदरनिर्वाहाचा आधार असलेल्या व्यवसायाचा हातठेला विकूण पाच हजार रुपये भरले. त्यामुळे आपली परिस्थिती आणखीनच बिघडली, असे मत्ते यांचे म्हणणे आहे. वीज कंपनी अधिकाऱ्यांच्या अन्यायामुळे आपल्या कुटुंबाला मानसिक व आर्थिक त्रास होत असून या प्रकरणाची चौकशी करून आपल्या परिवारास न्याय मिळवून द्यावा अन्यथा वीज कंपनी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा मत्ते यांनी दिला आहे. (वार्ताहर)
रिडींग न घेताच ग्राहकांना वीज बिल
By admin | Updated: November 9, 2014 22:30 IST