सावली : खेडी हे गाव तालुक्यात विविध विषयाने चर्चेत असणारे गाव. मात्र, यावेळी गावात निवडणूक* न घेता बिनविरोध करण्याचा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला व नऊ सदस्य निवडले. गावात व तालुक्यात बिनविरोधची चर्चा असताना मात्र दहाव्या उमेदवाराने उमेदवारी दाखल केल्याने एका जागेसाठी निवडणूक* होत आहे.
सावली शहरापासून जवळच असलेले खेडी हे राजकारणी म्हणून ओळख असलेले गाव आहे. यावर्षी तालुक्याचा स्मार्ट ग्राम पुरस्कारही मिळविला. कोरोनाचा प्रादुर्भाव, शेतपिकाचे कमी उत्पन्न, झगडे भांडणे होऊ नये, गावात विकास कामांचा लाखो रुपयांचा विकास निधी मिळावा या उद्देशाने येथील ग्रामपंचायत निवडणूक* अविरोध करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी राजकारण न करता गावाच्या एकोप्यासाठी एकत्र येऊन निवडणूक* बिनविरोध करण्यासाठी निर्णय घेण्यात आला होता. तीन वाॅर्डांत एकूण नऊ सदस्यांसाठी नऊ उमेदवार निवडणूक* रिंगणात उभे केले होते. त्यामुळे आता ग्रामपंचायत बिनविरोध होणार असे बॅनरही झळकले. बिनविरोधचे चित्र दिसत असतानाच मात्र अखेरच्या दिवशी म्हणजे ३० डिसेंबरला वाॅर्ड क्र. ३ मध्ये अनुसूचित महिला आरक्षण जागेवर विरुद्ध बाजूचे नामांकन दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली. सर्वपक्षीय कार्यकर्ते व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र काहीच फायदा झाला नाही. आता नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतमध्ये एका सदस्यासाठी निवडणूक* होणार आहे. गावात निवडणूक* होणार असल्याने गावाचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.