बळीराजा हवालदिल : रबी, गारपीट अनुदान वाटपाचे काम कर्मचाऱ्यांअभावी ठप्पखडसंगी: जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून महसूल यंत्रणा निवडणुकीच्या कामाला जुंपली आहे. या निवडणुकीमुळे रब्बी, गारपीट अनुदान वाटप प्रक्रीया रखडली आहे. पावसाने फिरवलेली पाठ आणि अनुदान मिळण्यास होत असलेला विलंब यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदील झाला आहे.मागील हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने २०१४-१५ या वर्षातील खरीप व रब्बी या दोन्ही हंगामातील अनेक गावामधील पैसेवारी कमी आली. शासनाने राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला. त्यामुळे दुष्काळ जाहीर केलेल्या गावात टंचाई उपाययोजना राबविण्याबरोबरच नुकसानी पोटी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यांपैकी खरीप हंगामातील काही प्रमाणात अनुदान वाटप झाले आहे.विदर्भात रब्बीचे पीक हाती येत असतानाच गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने जिल्हा प्रशासनाकडे अनुदान वर्ग केले आहे. अनुदान वाटपास सुरुवात होत नाही, तोच या अनुदान वाटपात तिढा निर्माण झाला होता. अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीच अनुदान असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. याबाबत तोडगा निघेपर्यंत रब्बी हंगामातील अनुदान रखडले होते. काही प्रमाणात अनुदान वाटप होत नाही. तोच जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यामुळे मागील महिन्यापासून निवडणुकीच्या कामात कर्मचारी गुंतले आहेत.निवडणुकीच्या कामासाठी महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. अनुदान वाटपात तहसीलदार आणि गावपातळीवरील तलाठी यांची भूमिका महत्वाची आहे. मात्र ४ जुलैपासून महसूल कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने रब्बी हंगामातील अनुदान वाटप प्रक्रिया रखडली आहे. शासनाकडे सन २०१२-१३ या वर्षातील रब्बीचे अनुदान शासनाकडे प्रलंबित होते. दोन वर्षानंतर नुकतेच हे अनुदान प्रशासनाकडे उपलब्ध झाले.रब्बीची वाटप प्रक्रिया सुरु होती. गारपीट अनुदानाच्या वाटपाची जुळवाजुळव सुरु होती, २०१२-१३ या वर्षातील रब्बी अनुदानाच्या लाभधारक शेतकऱ्यांच्या नावाच्या यादीची शोधाशोध सुरू असतानाच ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आणि अनुदान वाटपावर अवकळा पसरली. त्यामुळे दुष्काळात होरपळत असलेल्या बाधित शेतकऱ्यांवर आता पावसासोबत अनुदानाची वाट पाहण्याची वेळ आली आहे. (वार्ताहर)
शेतकऱ्यांच्या अनुदानावर निवडणुकीने अवकळा
By admin | Updated: August 3, 2015 00:41 IST