सिंदेवाही : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. या निवडणुकीत लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिकाऱ्यांचा कस लागणार आहे. त्यांच्या गावातील लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
तालुक्याच्या अनेक गावांमधून राजकीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधी पुढे आले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यासह विविध पक्षाचे तालुका पदाधिकारी आहेत, यांच्या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोनवाही, नवरगाव, वासेरा, मोहाडी, गुंजेवाही, रत्नापूर, शिवनी, पळसगाव जाट येथील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या गावात कोणाचे पॅनल विजय होणार, याबाबत तर्कवितर्क सुरू आहे. अनेक गावात प्रस्थापितांविरुद्ध युवकाने दंड थोपटले आहे, त्यामुळे प्रस्थापित गाव पुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत यांची राजकीय ताकद पणास लागली आहे, ग्रामपंचायत निवडणुकीचे समीकरण बदलण्याचे संकेत आहेत. काही गाव पुढारी या निवडणुकीकडे लक्ष देणार नसल्याचे सांगतात, परंतु पडद्याआडून तेच सर्व सूत्रे हलवीत आहेत. त्यांना रसद पोहोचविली जात आहे, या निवडणुकीत काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, आप पार्टी, अपक्ष यांचे समर्थक पॅनल उभे आहेत. तालुक्यात अनेक आजी-माजी सरपंच यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.