नुकसानभरपाईची मागणी
सिंदेवाही : ग्रामपंचायत निवडणुकीत भाग घेणाऱ्या कर्मचारीवर्गांना पोहचता करणाऱ्या एसटीच्या चालकाचे बस मागे घेताना नियंत्रण सुटल्याने रेल्वे स्टेशन परिसरातील संगीता गोहणे यांच्या हॉटेलच्या समोरील टिनाच्या शेडला बसची धड़क बसली. ही घटना शुक्रवारी घडली.
संगीता गोहणे यांचे बऱ्याच वर्षापासून रेल्वे स्टेशन परिसरात हॅाटेल आहे. शुक्रवारी मतदान झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना नेणाऱ्या बसची त्यांच्या हॉटेलच्या शेडला धडक बसली. यात शेडचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे संगीता गोहणे या विधवा महिलेवर संकटच कोसळले आहे. हाती पैसा नाही व कुणाची सोबतही नाही, अशा अवस्थेत पुन्हा शेड कसे उभारायचे, हा मोठा प्रश्न उभा ठाकला असून एसटी महामंडळाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत तहसीलदार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.