ब्रह्मपुरी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ब्रह्मपुरीतील शुक्रवारची प्रचार सभा उपस्थित जनसमुदायासाठी आठवणीत राहणारी ठरली. धारदार आणि दमदार भाषणासाठी प्रसिद्ध असलेल्या नरेंद्र मोदी यांचा आवाज ऐकण्यासाठी हृदयाचा कान करून आलेल्या जनसमुदायाला त्यांच्या चिंब भाषणाची प्रतिक्षा होती. मात्र गळ्याच्या त्रासामुळे ते भाषण करू शकले नाही. अवघे आठ मिनीटांचे त्यांचे भाषण झाले. मात्र ही आठ मिनीटे जनमानसाचा ठाव घेणारी ठरली.स्थानिक वनविभागाच्या प्रांगणावर सकाळी ही सभा पार पडली. विशेष सुरक्षा पथकाच्या दोन हेलिकॉप्टरसह त्यांचेही हेलिकॉप्टर सकाळी ठिक १०.१५ वाजता हेलिपॅडवर उतरले. त्यानंतर जनतेला हात उंचावत त्यांचे सभामंचावर आगमन झाले. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील नऊही भाजपा उमेदवारांकडून त्यांनी भव्य पुष्पहाराचा स्विकार केला. ठीक १०.३८ वाजता पंतप्रधानांनी भाषणाला सुरूवात केली. मात्र सुरूवातीलाच त्यांना बोलताना त्रास जाणवायला लागला. कालपर्यंत आपल्या तब्येतीची गाडी बरोबर होती. मात्र रात्रीतून घसरली, असे सांगून त्यांनी मिस्कीली पसरविली. आपल्या आठ मिनीटांच्या भाषणात धान उत्पादकांच्या समस्या, सिंचन, नक्षलवाद, भ्रष्टाचार निर्मूलन, बेरोजगारी यासह विविध विषयांना त्यांनी हात घातला. घसा साथ देत नसल्यामुळे अधिक बोलू शकत नसल्याची खंत व्यक्त करून, पुन्हा भेटीसाठी येण्याचेही आश्वासन दिले. या आठ मिनिटांच्या काळात हजारोंच्या संख्येतील उपस्थित जनसमुदाय अगदी शांतपणे त्यांचा शब्द न शब्द ऐकत होता. ‘पिन ड्रॉप सायलेंट’चा अनुभव यावेळी आला. मोदींचे भाषण संपल्यावरही जनता जागची हलायला तयार नव्हती. त्यांचे हेलिकॉप्टर आकाशात झेपावल्यावच श्रोते परतले. (प्रतिनिधी)
आठ मिनिटे, पण जनमानसाचा ठाव घेणारी
By admin | Updated: October 11, 2014 01:26 IST