व्हॉल्व्हमधून गळती : प्रशासनाच्या दुर्लक्षाने आरोग्य धोक्यातदुर्गापूर : दुर्गापूर गावात पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या पाईप लाईनवर बसविण्यात आलेले दोन व्हॉल्व्ह गेल्या अनेक वर्षांपासून लिकेज आहेत. त्यामधून घाण पाणी पाईपमध्ये शिरुन पाणी दूषित होत आहे. तेच पाणी पिण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे लिकेज तातडीने दुरुस्त करणे गरजेचे असताना ग्रामपंचायत व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.दुर्गापूर गावातील नागरिकांना पाण्याच्या टाकीतून पाण्याचा पुरवठा केला जातो. येथील वॉर्ड क्रमांक एकमध्ये पाण्याची टाकी आहे. टाकीतील पाण्याचा गावात पुरवठा करण्यासाठी दोन मुख्य व्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. सदर व्हॉल्व्ह टाकीलगत रस्त्याच्या एका कडेला आहेत. दोन्ही व्हॉल्व्ह गत अनेक वर्षांपासून लिकेज आहेत. गावात पाणी पुरवठा करण्याकरिता दररोज व्हॉल्व्ह उघडल्या जातात. हे व्हॉल्व्ह खोल खड्डयात पीव्हीसी पाईपच्या आवरणात असल्यामुळे येथे पाणी साचून राहते. दरम्यान गावातील भटकणारी कुत्री यातील पाणी पितात. त्यांची लाळ या पाण्यात मिसळते.पाणी पुरवठयाचा कालावधी संपल्यानंतर ते व्हॉल्व्ह बंद करण्यात येतात. या लिकेज व्हॉल्व्हमधून परत तेच विषाक्त झालेले पाणी आत शिरून वितरण पाईप लाईनमध्ये शिरते, असे आरोग्यास घातक असलेल्या पाण्याचा जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध झालेल्या पाण्याशी संयोग होतो व तेच पाणी नागरिकांच्या घरोघरी जात आहे. नागरिकांना याची पुसटशी कल्पनाही नसल्याने निरागस नागरिक ते पाणी पित आहेत.कुत्र्यांची लाळ मिसळलेले पाणी आरोग्यास घातक असते. मात्र सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांनी या व्हॉल्व्हची दुरुस्ती न करता आहे, त्याच अवस्थेत ठेवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळखंडोबा सुरू ठेवला आहे. गावात पाईपलाईनवर बसविलेले बहुतेक व्हॉल्व्ह लिकेज आहेत. त्याची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे आहे. याशिवाय यांच्यावर झाकण बसवून ते बंद करणे आवश्यक आहे, अशा आरोग्याशी निगडीत बाबीकडे येथील ग्रामपंचायत व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत सर्वचस्तरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. वेळीच याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)
दुर्गापूरवासीयांना होत आहे दूषित पाण्याचा पुरवठा
By admin | Updated: April 21, 2015 01:04 IST