सकारात्मक तोडगा निघेल : सुधीर मुनगंटीवार यांचा विश्वासलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दुगार्पूर येथील वार्ड क्र. ३ मधील जमिनीच्या प्रश्नासंदर्भात वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २६ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. याप्रकरणी नुकतीच मंत्रालयात बैठक झाली होती. या बैठकीत नागरिकांना घरे देण्याचा निर्णय झाल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यासंदर्भात चंद्रपूर जिल्हा प्रशासनातर्फे उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करणार आहे. संबंधित जागा सरकारजमा करण्याचा प्रस्ताव असून नागरिकांची घरे तोडता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.अतिक्रमण म्हणून जमिनीचे पट्टे दिले तर शुल्क भरण्याचे नागरिकांनी मान्य केले आहे. त्या अनुषंगाने नियमानुसार नागरिकांकडून भोगाधिकार शुल्क घेण्यात येईल व नागरिकांना जागेचे पट्टे देण्यात येईल, असा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नसून याप्रकरणी निश्चीतपणे योग्य तोडगा निघेल, असा विश्वास वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यांनी व्यक्त केला. न्यायालयाने जर आमच्या बाजूने निर्णय दिला तर ही प्रक्रिया शासन व प्रशासन अधिक सुलभपणे राबवेल व नागरिकांना शक्य तितक्या लवकर घरांचे पट्टे देण्यात येतील, असेही ते यावेळी म्हणाले. नागरिकांनी याप्रकरणी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे. या प्रक्रियेतून प्रत्येकाला आपल्या हक्काचे घर मिळणार असून पट्टे देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या परिसरात हातपंप, सामाजिक सभागृह, अंगणवाडी आदी सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेवू, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, पोलिस अधीक्षक नियती ठाकेर, जिल्हा परिषद सदस्य रोशनी खान सातकर, रामपाल सिंह, राजेंद्र मेश्राम, कापगते आदी उपस्थिती होते.
दुर्गापूर जमीन प्रकरणी प्रशासन उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करणार
By admin | Updated: May 27, 2017 00:35 IST