चंद्रपूर : महानगरपालिकेच्या आमसभेच्या विषयसूचीमध्ये अखेरच्या क्रमांकावर असलेल्या घनकचरा संकलनाच्या मुद्यावरून आमसभेत चांगलाच गोंधळ झाला. काही नगरसेवकांनी या ठरावाला कडाडून विरोध केला. मात्र या ठरावाला मान्यता देणाऱ्या नगरसेवकांची संख्या अधिक पडल्याने गोंधळात हा ठराव मंजूर करण्यात आला.महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज सोमवारी मनपाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. महापौर राखी कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत प्रारंभी एलबीटी, विविध कर, मागील सभेचा वृत्तांत इत्यादी किरकोळ विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर ‘घनकचरा व्यवस्थापन, घर, व्यावसायिक ठिकाणावरून कचरा संकलित करणे’ या विषय सभेच्या अखेर चर्चेला आला. हा विषय सभागृहापुढे येताच नगरसेविका सुनिता लोढिया, नगरसेवक प्रविण पडवेकर, देविदास गेडाम व काही नगरसेवकांनी याला कडाडून विरोध केला. जे काम आधीच कंत्राटदारामार्फत सुरू आहे, त्या कामाचे पुन्हा टेंडर काढून तेच काम त्याच कंत्राटदाराला देणे म्हणजे जनतेचा पैसा अनाठायी खर्च करणे आहे, असे सांगत हा विषय नामंजूर करण्याची मागणी या नगरसेवकांनी केली. मात्र घराघरांमधून कचरा संकलित होणार असेल व चंद्रपूर कचरामुक्त व सुंदर होणार असेल, तर याला विरोध का, असे महापौर, सभापती व बहुतांश नगरसेवकांचे म्हणणे होते. काही वेळ या मुद्यांवरून सभागृहात चांगलाच गोंधळ निर्माण झाला. अखेर गोंधळातच या विषयाला बहुमताचा आधार घेत मंजुरी देण्यात आली. घनकचरा संकलाचे हे कंत्राट नागपूर येथील सेन्ट्रल फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशन कंपनीला देण्यात आले आहे. हे कंत्राट पुढील पाच वर्षांसाठी असून प्रति महिना ५४ लाख रुपये कंपनीला द्यावे लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)सत्ताधाऱ्यांना कचरामुक्तीचा ध्यास४चंद्रपूर शहराला कंटेनर व कचरामुक्त बनवून शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्याचा महापालिकेचा मानस आहे. घराघरांमधून कचरा संकलित करण्याच्या कामाचे कंत्राट महापालिकेच्या आजच्या आमसभेत मंजूर झाले असून यादृष्टीने पहिले पाऊलही मनपाने पुढे टाकले आहे, अशी माहिती महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंत देशमुख, स्थायी समितीचे सभापती रामू तिवारी, आयुक्त सुधीर शंभरकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत दिली. आमसभा झाल्यानंतर मनपाच्या नवीन इमारतींमध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. शहरात २०० घंटागाड्या फिरविल्या जाणार आहे. या घंटागाड्या प्रत्येक घरात जाऊन कचरा संकलित करतील व शहराच्या प्रमुख मार्गाने फिरणाऱ्या १० मोठ्या वाहनांमध्ये हा कचरा टाकला जाईल. त्या वाहनाद्वारे कचरा बायपास मार्गावरील डम्पींग यार्डमध्ये टाकला जाणार आहे. यामुळे शहरात कुठेही कचऱ्याचे कंटेनर व कचरा पडून असलेला दिसणार नाही, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. या कंत्राटात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाईल व त्यांच्या पी.एफ.ही काटला जाईल. यात थोडााफार खर्च मनपाला उचलावा लागणार आहे. मात्र नागरिकांच्या आरोग्यासाठी हे करणे अनिवार्य असल्याचे आयुक्त सुधीर शंभरकर यांनी सांगितले. काँग्रेसचा गट म्हणतो, लुटमार थांबवा४घनकचरा जमा करून डम्पींग यार्डवर टाकण्यासाठी महापालिकेने आधीच २० लाख रुपये प्रति महिन्याने कंत्राट दिले आहे. हे काम सुरूदेखील आहे. तरीही पुन्हा घराघरांमधून कचरा संकलित करण्याचे ५४ लाख प्रति महिन्याचे कंत्राट महानगरपालिकेने मंजूर केले. महापालिकेच्या पैशाची ही लुटमार असून याला आपण विरोध दर्शवित असल्याचे नगरसेवक प्रविण पडवेकर, नगरसेविका सुनिता लोढिया, नगरसेवक अशोक नागापुरे, गजानन गावंडे आदींनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी महापौर व आयुक्तांना निवेदनही दिले आहे. सध्या शहरात कचरा संकलित करण्याचे काम सुरू आहे. बचतगटाच्या महिला या काम करीत आहेत. त्यांना मनपातर्फे एक हजार रुपये दिले जात असून घराघरातून ३० रुपये महिना देण्यात येत आहे. काही नागरिक पैसे देत नसल्याने महापालिकेने तीन हजार रुपये मानधन द्यावे, अशी मागणी बचत गटाच्या महिलांनी केली आहे. यात मनपाने २०० ट्रॉली लावून प्रतिमाह तीनशे रुपये मानधन दिले तर त्याला सहा लाख रुपये खर्च येऊ शकतो. परंतु हे काम त्यांना न देता नागपूरच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशनला दिले आहे. वास्तविक आधीचे कामही याच कंपनीला दिले आहे. आधीचे काम सुरू असताना पुन्हा तेच काम त्याच कंपनीला देणे हा पैशाचा अनाठायी खर्च असल्याचे पडवेकर, लोढिया आदींनी म्हटले आहे. हे कंत्राट रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
मनपाच्या आमसभेत कचऱ्याचा घणाघात
By admin | Updated: February 24, 2015 01:48 IST