नवरगाव: सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील तेरा वर्षाच्या मुलीचे कंबरेपासून खालील शरीर लुळे पडले. मात्र आर्थिक अडचणीमुळे ती उपचार घेऊ शकत नसल्याने तिच्यावर शाळा सोडण्याची पाळी आली आहे. यामुळे तिचे आयुष्यही धोक्यात आले आहे.रत्नापूर निवासी विश्वेश्वर शेंडे हे मजुरीचे काम करुन कुटुंबाचा उदर्निवाह चालवितात. स्वत:ची शेती नाही. केवळ मिळेल त्या कामावर मजुरी करुन दोघेही पती-पत्नी मुलाबाळांना अशाही परिस्थितीत शिक्षण देत आहेत. आई अशिक्षित तर वडीलही जेमतेम दुसरा- तिसरा वर्ग शिकलेले. आपण शिकलो नाही, याची खंत बाळगून मुलांना शिक्षण देत आहेत. रेणुका ही १३ वर्षाची असून भारत विद्यालय नवरगाव येथे आठव्या वर्गात शिकते. दुसरी मुलगी पाचव्या वर्गात तर लहान मुलगा तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे.हे सर्व सुरळीत सुरु असताना मोठी मुलगी रेणुका हीचे शरीर कंबरेपासून अचानक लुळे पडले. त्यामुळे स्वत:च्या पायावर ती उभीच राहू शकत नाही. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. हातावर आणायचे व पाणावर खायचे. अशाही परिस्थितीत नातेवाईकांकडून ३५-४० हजार रुपये उसनवारी करुन चंद्रपूर आणि गडचिरोली येथे उपचार केला. पैसा खर्च झाला. परंतु फायदा काहीच नाही. पुन्हा पैसा कुठुन उभा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतरही न खचता रेणुकाच्या वडीलांनी परिसरातील नागरिकांना समस्या सांगून थोडेबहूत पैसे गोळा केले. भारत विद्यालय नवरगाव येथील शिक्षकांनी चार हजार रुपयांचा निधी गोळा केला व दिला. याच पैशातून रेणुकाला उपचारासाठी लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर या ठिकाणी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंततर आॅपरेशनचा सल्ला दिला. ६०-७० हजार रुपये खर्च येणार. परंतु आॅपरेशन केल्यानंतर ती दुरूस्त होईलच, असा विश्वास देऊ शकत नाही, असे डॉक्टरांनी सांगताच आई- वडील घाबरले. एवढा पैसा कुठून उभा करायचा, हा प्रश्नही आहेच. दुरुस्तीची शाश्वती नाही. त्यामुळे पुन्हा इतरत्र न नेता रेणुकाला घरी आणण्यात आले आहे. तिची प्रकृती दिवसेंदिवस खालवत आहे. रक्तामध्ये काहीतरी फरक पडल्याने तिच्या शरीरावर फुळ्या येत असून जखमाही होत आहे. मात्र इतरत्र नेऊन उपचार करण्यासाठी आई-वडील आर्थिक अडचणीमुळे हतबल झाले आहेत. उपचाराअभावी तिच्यावर शाळा सोडण्याची वेळ आली आहे. चार महिन्यांपासून ती शाळेत गेलेली नाही.सामाजिक संस्थानी, राजकीय व्यक्तींनी, दानशूर व्यक्तींनी आर्थिक पुढाकार घेतल्यास चांगल्या दवाखान्यामध्ये उपचार केल्यास रेणुकाचा जीवनदान मिळू शकते. (वार्ताहर)
उपचाराअभावी रेणुकाचे आयुष्य काळवंडले
By admin | Updated: February 8, 2015 23:33 IST