आज निवडणूक : काँग्रेसच्या राखी कांचर्लावार झाल्या भाजपाच्या उमेदवारचंद्रपूर : येथील महापौरपदासाठी गुरूवारी निवडणूक होत आहे. काँगे्रसमधील गटबाजी शमविण्यात वरीष्ठांना यश आल्यासारखे दिसत असले तरी, ऐनवेळी महापौर गटाच्या राखी कांचर्लावार भाजापात गेल्या आहेत. महापौर संगीता अमृतकर यांच्या गटाकडून त्या महापौरपदाच्या नियोजित उमेदवार होत्या. यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी काय चित्र निर्माण होणार, याचा अंंदाज आता बहुतेकांना आला आहे.भाजपाचे चंद्रपूर महानगर अध्यक्ष विजय राऊत यांनी आज दुपारी एक पत्रक प्रसिद्धीस देऊन भाजपाकडून राखी कांचर्लावार या महापौरपदाच्या उमेदवार असतील, असे जाहीर केले आहे. कांचर्लावार यांनी भाजपात रितसर प्रवेश घेतल्याने त्या आपल्या पक्षाच्या उमेदवार असतील, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. चंद्रपूर महानगर पालिकेवर भाजपाचा झेंडा रोवण्यासाठी आपला पक्ष कटीबद्ध असल्याचे सांगून त्यांनी नव्या राजकीय समिकरणाचे संकेत दिले आहेत. राखी कांचर्लावार या काँग्रेसमधील महापौर गटाच्या उमेदवार होत्या. मात्र मंगळवारी काँग्रेसचे निवडणूक निरीक्षक नितीन राऊत यांनी गटनेते संतोष लहामगे यांच्यावर केलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर बुधवारी ही घडामोड झाली. या घडामोडीमागेही बरेच राजकारण असल्याचे दिसत आहे. दरम्यान, काँग्रेसमधील ओढाताण लक्षात घेता, पक्षाने अद्यापही आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. संभाव्य उमेदवार म्हणून सुनीता लोढीया आणि शिल्पा आंबेकर यांचे नाव पक्षाकडे पाठविण्यात आले आहे. सुनीता लोढीया महापौरपदाच्या निवडणुकीसाठी तयार असल्या तरी, अद्याप पक्षाकडून त्यांना हिरवा कंदील मिळालेला नाही. त्यामुळे गुरूवारी सकाळी प्रदेशाध्यक्षांकडून कोणाच्या नावाची चिठ्ठी निघते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
महापौरपदासाठी दुहेरी लढत
By admin | Updated: October 29, 2014 22:46 IST