जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत जागृती केल्याने अनेकांचे गैरसमज झाले. परिणामी, लस घेणारे नागरिक आता केंद्रासमोर गर्दी करीत आहेत. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी, सहव्याधी व ६० वर्षांवरील नागरिक लस घेत आहेत. यातील अनेकांच्या पहिल्या डोसला ४० ते ४२ दिवस झाले. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. त्यामुळे दुसरा डोस नेमका किती दिवसांनी घ्यायचा, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. त्यातच लसीचा तुटवडा असल्याने पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची विविध केंद्रांमध्ये भटकंती सुरू आहे. परिणामी, अनेकांच्या दुसऱ्या डोसला विलंब होण्याची शक्यता आहे. याबाबत लसीकरण केंद्रात कोणतीही माहितीपत्रके लावण्यात आली नाही. केंद्रातील कर्मचारी लसीकरणात व्यस्त असल्याने माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा परिस्थितीत दुसरा डोस केव्हा घेणार, याची माहितीच मिळाली नाही तर कसे होणार हा प्रश्न अस्वस्थ करीत आहे.
लॅन्सेटचा अहवाल काय सांगतो?
लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकात फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाशित माहितीनुसार, कोविडशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये सहा आठवड्यांपेक्षा कमी अंतर असेल तर ५५.१ टक्के परिणामकारक ठरते. १२ आठवड्यांच्या अंतराने दोन डोस दिले, तर ८१.३ टक्के परिणामकारकता आढळून आली आहे.
काही दिवसांनंतरच वाढतात अँटीबॉडी
कोविड लसीच्या दोन डोसांमध्ये चार ते सहा आठवड्याचे अंतर असावे, असे लसीकरणास सुरुवात झाली तेव्हा ठरविण्यात आले होते. परंतु, वैज्ञानिक संशोधनानंतर काढलेला निष्कर्ष व आयसीएमआर, कोरोना टास्क फोर्सनुसार कोविडशिल्ड लसीच्या दोन डोसमधील हे अंतर वाढवून सहा ते आठ आठवडे करण्यात आले. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर शरीरात प्रतिपिंड म्हणजे अँटिबॉडी तयार होण्यासाठी काही दिवस जावे लागतात.
कोट
लसीच्या उपलब्धतेनुसार दुसऱ्या डोससाठी स्वतंत्र केंद्र
लसीच्या उपलब्धतेनुसार केंद्र सुरू आहेत. मात्र, दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी चंद्रपूर शहर व जिल्ह्यातही स्वतंत्र केंद्र सज्ज ठेवण्यात आले. जादा लस मिळाल्यास ही केंद्रे कार्यान्वित होतात. २८ दिवसांतच दुसरा डोस घेणे आवश्यक नाही. ४५ ते ५६ दिवसांतही दुसरा डोस घेता येतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे काही कारण नाही.
-डॉ. संदीप गेडाम, जिल्हा लसीकरण अधिकारी, चंद्रपूर.