बाळू धानोरकर : रस्ते सुरक्षा अभियानाचे उद्घाटन
चंद्रपूर : वाहनचालकाची चूक असेल तेव्हाच त्यांचे चालान केले जाते. या बाबीचा नागरिकांनी प्रतिष्ठचा मुद्दा न बनवता रस्ते वाहतुकीसंबंधातील नियम हे नागरिकांच्या सुरक्षेकरिताच आहेत, याची जाणीव ठेवून वाहतूक नियमांचे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा पोलीस दल व शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ वे रस्ता सुरक्षा अभियानिचे उद्घाटन बाळू धानोरकर यांच्या हस्ते येथील नियोजन सभागृहात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधाक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, कार्यकारी अभियंता संतोष जाधव, एस.टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रक राजेंद्र पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे म्हणाले, एका व्यक्तीच्या अपघातामुळे संपुर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते, त्यामुळे वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे. हेल्मेट वापरणे, सीट बेल्ट बांधणे ही शिस्त आहे व या शिस्तीचे पालन वाहनचालकांकडून व्हायलाच हवे. तसेच वाहतूक पोलिसांनीदेखील नागरिकांना सौजन्यपूर्वक वागणूक द्यावी, असे साळवे यांनी सांगितले.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी अपघातमुक्त चंद्रपूर शहर घडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी रोज किमान तीन नागरिकांना वाहतूक नियमांची माहिती द्यावी, वाहनाचा वेग मर्यादित ठेवणे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचेही आवाहन केले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तयार केलेले वाहतुकीचे नियम व रस्ता सुरक्षा याची माहिती असणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संचालन मोन्टू सिंग, आभार वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांनी मानले.