मूल : महाराष्ट्रचे मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस व कॅबिनेटमंत्रीपदी सुधीर मुनगंटीवार यांची वर्णी लागल्यानंतर मूलमध्ये जल्लोष करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार यांची नाळ मूल तालुक्यांशी जुळली असल्याने मूलचा चेहरामोहरा बदलेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पक्षभेद न करता काम केल्याने त्यांचा मोठा मताधिक्याने विजय झाल्याचे सर्वसामान्य जनता बोलू लागली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. मा.सा. कन्नमवार यांच्या नावाने पाच कोटी रुपयाचे सांस्कृतिक भवन मंजूर करुन काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री कन्नमवार यांचा गौरव करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सांस्कृतिक कन्नमवार सभागृहाच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बोलाविण्यात आले होते. मात्र ते न आल्याने आपले सरकार आल्यावर आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री कन्नमवार सभागृहाचे उद्घाटन करेल,असे सुचक उद्गार त्याननी काढल्याची जनतेला आठवण आहे. या भवनाचे उद्घाटन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल हे निश्चित आहे. केंद्रीय निधीतून १५ कोटी रुपयाचा निधी मंजूर करुन सिमेंट रोडचे काम सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची ओढ निर्माण व्हावी यासाठी श्याममुखर्जी वाचनालयाचे बांधकाम सुरु झाले आहे. जवळपास १.५० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेली ही वास्तू शहराच्या विकासात भर घालणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
मूलमध्ये दिवाळी - आश्वासन पूर्तता होणार : जनतेला विश्वास
By admin | Updated: November 1, 2014 01:39 IST