चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा अधिवेशन शिक्षक आमदार नागो गाणार यांचे प्रमुख उपस्थितीत नागपूर विभागाचे अध्यक्ष डॉ. उल्हास फडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या अधिवेशनाला उद्घाटक म्हणून ना. हंसराज अहीर तर स्वागताध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे उपस्थित होते.दोन दिवसीय अधिवेशनात पहिल्या दिवशी सायंकाळी ७ वाजता शिक्षकांच्या समस्यांचे व तक्रार निवारणार्थ मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली. या शिक्षकांच्या वैयक्तिक आणि सामूहिक समस्या व तक्रारीवर नागपूर विभागाचे डॉ. उल्हास फडके, दीपक गोखले, सुदाम काकपुरे, दिलीप सुरकार, योगेश बंग यांनी समयोचित मार्गदर्शन केले. रात्री संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. यात दत्ता अक्कलवार, गणेश इंगोले, सुरदास वाभिटकर, देऊळकर यांनी आपल्या सुमधूर आवाजाने शिक्षकांना मंत्रमुग्ध केले.पहिल्या सत्रातील ‘आरटीई संच निर्धारण परिणाम व समायोजनाची समस्या’ या विषयावर सुदाम काकपुरे यांनी मार्गदर्शन केले. संघटन व कार्यकर्ता जडणघडण या दुसऱ्या विषयाला आश्विनी ताटीपामुलवार यांनी विविध उदाहरणे देवून साद घातली. उद्घाटनपर भाषणात ना. हंसराज अहीर यांनी शिक्षक हा शिक्षक नसून समाजाचा शिल्पकार आहे. बालमनावर संस्कार करुन, सृजन- सुसंस्कृत नागरिकांची निर्मिती करून देश घडविण्याचे सर्वात महान कार्य शिक्षक करतो. शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शिक्षक क्षेत्रातील संकटाची जाणिव करुन दिली. ते म्हणाले, पूर्वी मी विधानपरिषदेत डाव्या बाजूला विरोधात बसत होतो. तेव्हाही शिक्षकांची समस्या मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न करीत होतो. आता विधानपरिषदेत उजव्या बाजुला सत्तापक्षाकडे बसत असलो तरी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सत्तापक्षाच्या विरोधात सदैव तत्पर राहील. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे यथोचित समायोजनासाठी प्रयत्नशील राहील. सात टक्के महागाई भत्ता पुढील महिन्यापर्यंत घोषित करण्यात येईल. शिक्षक सेवकांची सेवा पूर्ववत सुरू राहील, यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यात निश्चित यश येईल, असे ते म्हणाले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष दिवाकर पुद्दटवार यांनी केले, तर अहवाल वाचन जिल्हा कार्यवाह प्रा. अरुण रहांगडाले यांनी केले. प्राथमिकचे अहवाल वाचन विकास नंदुरकर तर जिल्हा परिषद प्राथमिकचे अहवाल वाचन प्रकाश चुनारकर यांनी केले. संचालन शुभांगी खाडीलकर यांनी तर आभार सुरेश गिलोरकर यांनी मानले. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी गुरुदास कामडी, पुंजाराम लोडे, देवेंद्र कंचर्लावार, विनोद एडलावार, सुनील पाचखेडे, सुहास पडोळे, रमेश चिकाटे, संतोष साठे, योगराज भिवगडे, हरिश्चंद्र काळे, विपीन मानकर, प्रफुल्ल राजपुरोहित, मारोती आसुटकर, देवीदास चवले, राकेश बुटले, प्रकाश मुत्येलवार, मोहन कुकडपवार, भास्कर राऊत, चंद्रशेखर जोशी, राजू लांजेवार, सरिता सोनकुसरे, स्रेहल बांगडे, मंगला बंडीवार, चारुशिला गेडाम, विभावरी वखरे आणि समस्य कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा अधिवेशन
By admin | Updated: February 3, 2015 22:53 IST