जिवती : एकीकडे पहाडावरील अनेक शाळेत शिकवायला शिक्षकच नाहीत. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या गंभीर बाबीकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करुन तालुक्यातील हिमायतनगर, भोक्सापूर, पाटागुडा, मरकलमेंढा, जिवती येथील शिक्षकांना पंचायत समिती कार्यालयातील प्रलंबित शिक्षकांच्या समस्या तातडीने निकाली काढण्यासाठी ‘बाबुगिरी’ करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.सर्व शिक्षा अभियानाच्या उद्दिष्टांच्या पुर्ततेसाठी वर्ग खोल्याच्या बांधकामापासून तर शिक्षण विभागाला शालेय कागदपत्राची पुर्तता करणे तसेच विद्यार्थ्यांना गुणवंतापूर्ण शिक्षण देणे अशा अनेक महत्त्वाच्या कामाची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. शाळेत विद्यार्थी पटसंख्या भरमसाठ आहे. त्यानुसार शिक्षकांची नियुक्ती शाळेत केली नाही. त्यामुळे पहाडावरील विद्यार्थ्यांच्या शिकवणीकडे पाहीजे त्या प्रमाणात लक्ष देऊ शकत नाही. परिणामी शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याची बाब अधिकाऱ्यांना माहित असतानाही शिक्षकांना शाळे व्यतिरिक्त कामे सापेविण्यात येत आहेत. पंचायत समिती कार्यालयात लिपिकाचे काम करणारे बाबु असतानाही कार्यालयातील प्रलंबित कामे करण्याची जबाबदारी शिक्षकांना देण्यात आली. त्यामुळे शिक्षकांना पंचायत समितीमध्ये बाबुगीरी करण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील अनेक शाळेत शिक्षकांची कमतरता आहे. परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा खालावला जात आहे. तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करुन पंचायत समिती कार्यालयातील प्रलंबित कामासाठी शिक्षकांना बाबुगिरी करायला लावण्यात येत आहे. त्यामुळे आदीपासून तालुक्यातील जि. प. शाळांचा दर्जा आणखीनच खालावण्याचे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)
जि. प.चे शिक्षक करतात पंचायत समितीत बाबुुुगिरी
By admin | Updated: August 11, 2016 00:44 IST