सावरगाव : नागभीड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या कोजबी माल येथील वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वासुदेव रामजी कोंडेकर यांच्या कुटुंबीयास तळोधी-गोविंदपूर जिल्हा परिषद क्षेत्राचे जि.प. सदस्य खोजराम मरसकोल्हे यांच्या हस्ते वनविभागातर्फे चार लाख ८० हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
कोजबी माल येथील वासुदेव रामजी कोडेंकर हे १ मार्च रोजी त्यांचा शेतालगत सरपण गोळा करीत असताना, वाघाच्या हल्ल्यात ठार झाले. त्या निमित्त सानुग्रह राशी म्हणून वन विभागातर्फे चार लाख ८० हजार रुपयांचा धनादेश त्यांचा पत्नी सुशिला वासुदेव कोडेंकर यांना जि.प.सदस्य खोजराम मरस्कोल्हे यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला. याप्रसंगी उपवन अधिकारी दीपेश मल्होत्रा, तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी गायकवाड, सरपंच शेवंताबाई सोमाजी भोयर, उपसरपंच रवींद्रनाथ पर्वते, विशाल गोपाले, जगदीश सडमाके आणि कोंडेकर कुटुंबीयांची उपस्थिती होती.