सिंदेवाही : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, नाचणभट्टी येथे शिक्षण घेतलेली स्नेहल गेडाम ही विद्यार्थिनी सिंदेवाहीतील जलसिंचन विभागात अभियंता पदावर रुजू झाली आहे.
स्नेहलने जिल्हा परिषद शाळेतील भक्कम प्राथमिक गुणवत्तापूर्ण शिक्षण व प्रयोगशील अध्यापक यांच्यामुळेच आज मला अभियंता पदावर पोहोचता आल्याचे गर्वाने सांगितले. तिने माध्यमिक शिक्षण नवरगाव येथील लोकसेवा विद्यालयात व त्यानंतर ज्ञानेश कनिष्ठ महाविद्यालय येथे पुढील शिक्षण पूर्ण केले. तेथून उत्तम गुणांनी बारावी परीक्षा उत्तीर्ण करून शासकीय इंजिनिअरिंग महाविद्यालय, चंद्रपूर येथे प्रवेश मिळवला आणि तेथून इंजिनिअरिंगची पदवी घेऊन पुढे नागपूरला स्पर्धा परीक्षांची तयारी करून २०१८ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. या परीक्षेत यश मिळाल्याने २०२०पासून ती सिंदेवाहीतील जलसिंचन विभागात सहायक अभियंता पदावर कार्यरत आहे.