शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थी हिरमुसले : प्रवेशोत्सव आनंदात, पुस्तकदिनावर नाराजीनितीन मुसळे सास्तीशासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे शाळेच्या पहिल्या दिवशी विविध उपक्रमांसह प्रवेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले तर सोबतच या वर्षीपासून शाळेचा पहिला दिवस हा पुस्तक दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. ठिकठिकाणी तो साजराही करण्यात आला. परंतु जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये अपुऱ्या पुस्तकसंख्येमुळे अनेक विद्यार्थ्यांना पुस्तकाविनाच पुस्तकदिन साजरा करावा लागला. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी हिरमुसले व त्यांच्या आनंदावर मात्र विरजन पडले असल्याचे दिसून येत आहे.शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आनंददायी वातावरण निर्मिती व्हावी, या अनुषंगाने प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सोबतच शाळेचा पहिल्या दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप करून शाळेचा पहिला दिवस हा पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेमध्ये साफसफाई, शाळेच्या पटांगणात रांगोळ्या, गावातून प्रभातफेरी काढून प्रवेशोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.शाळेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या स्वागतामुळे आणि प्रसन्न वातावरणामुळे विद्यार्थ्यांची शाळेबाबतची गोडी वाढणार असून उपस्थिती वाढीसही मदत होणार आहे. परंतू जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये पहिल्या दिवशी पुस्तकांच्या अपुऱ्या संख्येमुळे अनेक विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नाही. त्यामुळे काही शाळांमधील विद्यार्थ्यांचे चेहरे या प्रवेशोत्सवाच्या आनंदी क्षणातही हिरमुसले होते. शासनाच्या-प्रशासनाच्या या दिरंगाई कारभारामुळे मात्र पुस्तकदिनी अनेक विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजन पडले.जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका, शासकीय शाळा, खासगी अनुदानित शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीच्या दोन लाख १४ हजार २९१ विद्यार्थ्यांकरिता १४ लाख ४७ हजार १८६ पुस्तकांची मागणी केली गेली होती. परंतु जिल्ह्यात शाळा प्रवेशाच्या दिवशीपर्यंत ११ लाख १६ हजार ४३१ पुस्तके प्राप्त झाली होती. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करता आले नाही. राजुरा तालुक्यातील साखरी केंद्रातही अशीच स्थिती होती. केंद्रात जिल्हा परिषदेच्या इतर शाळांसोबतच तीन खाजगी अनुदानित माध्यमिक शाळा आहेत. त्या शाळांमधील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनाही पुस्तकांचे वापट केले जात. परंतु या शाळांनी मागणी केलेल्या पुस्तक संख्येपेक्षा कितीतरी पुस्तके कमी होती. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करता आले नाही. त्यामुळे साखरी केंद्रासारख्या जिल्ह्यातील इतरही भागातील काही विद्यार्थ्यांना पुस्तकदिनी पुस्तकाअभावी हिरमुसावे लागले हे मात्र खरे.
अपुऱ्या पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण
By admin | Updated: June 29, 2015 01:39 IST