चंद्रपूर : भटक्या जाती, विमुक्त जमातीतील विद्यार्थिनींना शाळेची ओढ लागावी, गळतीचे प्रमाण कमी व्हावे सोबतच त्यांना थोडाफार शैक्षणिक खर्च भागविता यावा यासाठी पहिली ते चौथी मधील विद्यार्थिनींना रोज एक रुपया याप्रमाणे उपस्थिती भत्ता दिला जात होता. मात्र या वर्षी कोरोनाचे कारण सांगून हा भत्ता बंद करण्यात आला. याचा फटका जिल्ह्यातील हजारो विद्यार्थिनींना बसला आहे. त्यामुळे या निर्णयाविरुद्ध नाराजी व्यक्त होत आहे.
शैक्षणिक सत्रातील एकूण कामकाजाच्या दिवसांचा विचार करून साधारणत: २२० दिवस होतात. त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थिनीला वर्षाकाठी २२० रुपये उपस्थिती भत्ता दिला जात होता. यासाठी महिन्यातील एकूण शालेय दिवसांपैकी ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. जिल्ह्यात अनु. जाती, भटक्या जाती, विमुक्त जमातीमधील दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. साठी निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र आता उपस्थिती भत्ताच बंद करण्याचे शासन आदेश असल्याने जिल्ह्यातील विद्यार्थिनींना याचा फटका बसला आहे.