भद्रावती : मुख्य रस्त्यावर असलेली दोन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली. गल्ल्यातील सात ते आठ हजार रुपयेही पळविले. दुसऱ्या एका घटनेत अज्ञात व्यक्तीनी बसस्थानक परिसरातील तीन बसेसची तोडफोड केली. या दोन्ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडल्या.शहराच्या मुख्य मार्गावर सातपुते मेडिकल, सातपुते बेकरी आहे. या दोन्ही दुकानांचे शटर सब्बलने फोडून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. दोन्ही दुकानाच्या गल्ल्यातील जवळपास सात ते आठ हजारांची रक्कम लंपास केली. अन्य साहित्यास चोरट्यांनी हात लावला नाही. दुकानातील सीसीटीव्हीत एका चोरट्याचे अस्पष्ट चित्रण आले आहे. त्याआधारे पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहे. दुसऱ्या एका घटनेत भद्रावती बसस्थानकाच्या आवारात काही बसेस होत्या. यातील एमएच- ४०-८५२०, एमएच ४०-८१६७ आणि एमएच-८७७० या बसेसही अज्ञात व्यक्तीनी तोडफोड केली. एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुरक्षेची कोणतीच व्यवस्था नाही. या दोन्ही घटनेत आरोपींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)
बसस्थानकावरील बसेसची तोडफोड
By admin | Updated: October 12, 2015 01:29 IST