घोडपेठ : येथून जवळच असलेल्या ताडाळी एमआयडीसी येथील गोपानी आयर्न ॲण्ड पॉवर या कारखान्यातील वाहनचालक या पदावर कार्यरत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांचा पीएफ भरलाच जात नसल्याची, तसेच आठ तासांपेक्षा जास्त काम घेतले जात असल्याची रीतसर तक्रार कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात आली होती. त्यामुळे व्यवस्थापनातर्फे चिडून त्यांना कामावरून कमी करण्यात आले, असा आरोप कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात आला आहे.
ताडाळी एमआयडीसी येथील गोपानी आयरन ॲण्ड पॉवर या कारखान्यात चंद्रप्रकाश डहाट व अशोक कोटा हे मागील अंदाजे १६ वर्षांपासून, तर जालिंद्र ऊर्फ जितू दुर्गे हे मागील १० वर्षांपेक्षाही जास्त कालावधीपासून वाहनचालक (ड्रायव्हर) या पदावर कार्यरत होते. मात्र, आजतागायत कारखान्याने या कर्मचाऱ्यांचा पीएफ भरलाच नाही. कर्मचाऱ्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेकदा पीएफ भरण्याची विनंती करण्यात आली. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले.
तसेच या वाहनचालकांकडून दररोज ८ तासांपेक्षा जास्त काम करवून घेतले जात होते. त्यांची ड्यूटी शिफ्टच तशी लावण्यात येत होती. वारंवार विनंती करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने शेवटी कर्मचाऱ्यांनी सहायक कामगार आयुक्त व ईपीएफओ विभाग, चंद्रपूर यांच्याकडे रीतसर लेखी तक्रार दाखल केली होती.
आता या कर्मचाऱ्यांना १ एप्रिलपासून नोकरीवर येण्यास कारखान्याने मज्जाव केला आहे. कर्मचाऱ्यांनी विरोध करू नये, म्हणून १ एप्रिलपासून काही दिवस अतिरिक्त सुरक्षारक्षकांचा बंदोबस्तही व्यवस्थापनाकडून ठेवण्यात आला होता.
कामावरून कमी केल्यानंतर लगेच १ एप्रिल रोजी तशी लेखी सूचना सहायक कामगार आयुक्त व ईपीएफओच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांतर्फे देण्यात आली. प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कामावरून काढू नये, अशी विनंतीही पत्राद्वारे करण्यात आली आहे. मात्र, इतके दिवस उलटल्यानंतरही दोन्ही विभागांतर्फे कुठलीच कारवाई करण्यात आली नाही.