चंद्रपूर : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ कनेक्ट आणि विदर्भवादी संस्थांच्या वतीने १ मे रोजी स्वतंत्र विदर्भाचा ध्वज फडकविला जाणार आहे. विदर्भातील सर्व जिल्हा मुख्यालयी हे ध्वजारोहण होणार आहे. या अंतर्गत चंद्रपुरातील जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात १ मे रोजी सकाळी ९ वाजता विदर्भाचा ध्वज फडकविला जाणार आहे.विदर्भ कनेक्टच्या पुढाकारात झालेल्या या पत्रकारपरिषदेला चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक जीवतोडे, विदर्भ कनेक्टचे जिल्हाध्यक्ष बंडू धोतरे, अॅड. विजय मोगरे, विजय चंदावार आणि डॉ गोपाल मुंधडा प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले, आपली चळवळ अहिंसावादी असून लोकांमध्ये जागृती करणे आणि युवा वर्गात विदर्भ राज्याच्या मागणीसंदर्भात महत्व पटवून देण्यासाठी हा प्रयत्न आहे. वेगळे विदर्भ राज्य होणे ही काळाची गरज असल्याने हा लढा नेहमीच सुरू राहील, त्यात आपला सदैव सहभाग राहील, असे ते म्हणाले. अॅड. विजय मोगरे म्हणाले, जनतेचा दबाव राज्यकर्त्यांवर वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व जिल्हा मुख्यालयी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमांतर्गत चंद्रपुरातही हा उपक्रम राबविला जात आहे. ही चळवळ अधिक सशक्त व्हावी यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक, संस्थाचालक, कामगार आदी वर्गाला हाताशी घेऊन अहिंसेच्या मार्गाने लढा उभारला आहे. यापूर्वी ज्येष्ठ नागरिक संघाने घेतलेल्या जनमत चाचणीत ९७ टक्के कौल विदर्भाच्या बाजूने पडला होता. यावरून वेगळा विदर्भ व्हावा ही जनतेचीही इच्छा आहे, हे स्पष्ट होते, असेही ते म्हणाले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना विदर्भ राज्यनिर्मीतीसाठी शपथ दिली जाणार आहे. विदर्भ ही सर्वांची अस्मिता असल्याने नागरिकांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार परिषदेतून करण्यात आले.सर्व विदर्भवादी नेते आंदोलनात एकत्र का येत नाहीत या प्रश्नावर ते म्हणाले, सागरात पोहचायचे असले तरी नद्या वेगवेगळ्या असतात. उद्देश मात्र एकच असतो. चळवळी वेगवेगळा मार्गाने वाढल्या तर त्याचा आंदोलनालाच फायदा आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्रदिनी हे ध्वजारोहण ठेवणे याचा अर्थ महाराष्ट्राला विरोध आहे असे नव्हे, तर विदर्भाची मागणी प्रदर्शित करण्याचा हाच योग्य दिवस असल्याने आणि जनतेची मागणी सरकारच्या निदर्शनास येण्याच्या दृष्टीने १ मे रोजी ध्वजारोहण होणार असल्याचे यावेळी अॅड. मोगरे आणि विजय चंदावार यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी शहरात बॅनर पोष्टर लावण्यात आले आहेत. जनजागृतीसाठी कार्यकर्तेही झटत आहेत. पत्रकार परिषदेला प्राचार्य एम. सुभाष, प्राचार्य प्रभू चोथवे, प्रा. श्याम धोपटे, डॉ, योगेश दुधपचारे, प्रशांत आर्वे, सुधाकर अडबाले, प्रा. कमलाकर धानोरकर, प्रा. जुगलकिशोर सोमानी, प्रा. पृथ्वीराज खिंची आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
महाराष्ट्रदिनी फडकणार वेगळ्या विदर्भाचा झेंडा
By admin | Updated: April 30, 2015 01:22 IST