शंकरपूर : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळातर्फे चंद्रपूर जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. या खरेदी केंद्रातून धान खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे बोनससाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. शेतकऱ्यांना बोनस देण्यासाठी एनईएमएल कंपनीच्या संकेतस्थळावर शेतकऱ्यांच्या याद्या पाठविल्या जातात. त्या याद्या संस्थांना तपासणीकरिता आली असता, त्या यादीमध्ये संस्थांनी तयार केलेल्या यादीमध्ये तफावत असल्याची बाब पुढे आली आहे.
संस्थांकडील याद्यांमधील अनेक शेतकऱ्यांची नावे व एनईएमएल कंपनीच्या यादीमध्ये नसल्याचे दिसून आले आहे. बोनसचे वाटप करण्यात अडचण निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना ७०० रुपये प्रति क्विंटल बोनस राज्य शासनाने मंजूर केला आहे. त्यानुसार, ३१ मार्चपर्यंत २ लाख ६१ हजार ७१६ क्विंटल धान खरेदी करण्यात आला. ५० टक्के रक्कम ८ कोटी ९ लाख ३१ हजार रुपये चंद्रपूर कार्यालयाला प्राप्त झाले आहे, परंतु आदिवासी सोसायटीने पाठविलेल्या याद्या व संकेतस्थळावरील याद्यांमध्ये तफावत आल्याने शेतकऱ्यांना बोनससाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कोट
बोनस पात्र शेतकऱ्यांच्या याद्यांमध्ये तफावत आली होती. या याद्या संकेतस्थळावर अद्यावत करणे सुरू आहे. तीन ते चार दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील.
- जी.आर. कोटलवार, प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय, चंद्रपूर.