दीपक केसरकर : जिल्ह्यातील हुतात्मा स्मारक हायटेक करणार भद्रावती : भद्रावती म्हणजे काळ्या सोन्याची व पांढऱ्या सोन्याची खाण आहे. या परिसरात कापूस पीक मोठ्या प्रमाणात होते. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाचे मूल्यवर्धन करून विदर्भात कापूस ते कापड अशी मूल्यवर्धीत साखळी विकसित करण्यात येणार आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. त्यातून अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) तथा अर्थ व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले. नगर परिषद भद्रावती येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आ. बाळू धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, खाजगी सचिव विना बन्सोड, ठाणेदार विलास निकम उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यातील हुतात्मा स्मारक हायटेक करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ना. केसरकर यांनी सांगितले. अत्यंत कमी वेळात भद्रावती न.प. ने विकासाच्या बाबतीत उत्कृष्ठ कामगिरी केली असून येथील गणेश मंदिरालगतच्या तलाव सौंदर्यीकरणासाठी नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले. सर्व संस्कृतीचा संगम असलेल्या भद्रावती पर्यटनाच्या दृष्टीनेही मोठे पाऊल उचलण्यात येईल असे त्यांनी सांगितले. ना. केसरकर यांनी शहरातील हुतात्मा स्मारक, गवराळा गणेश मंदिर, विंजासन बौद्धलेणी, विंजासन टेकडीवरील देवीचे मंदिर या स्थळांना भेटी दिल्या. विंजासन बौद्धलेणी येथे बौद्ध बांधवांनी ना. दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर केले. हुतात्मा स्मारक येथे ना. केसरकर यांनी झाडी बोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. सुरेश परसावार, व सचिव पांडुरंग कांबळे यांच्यासोबत वाचनालयात चर्चा केली. याप्रसंगी आ. बाळू धानोरकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी भद्रावती नगर पालिकेला भेट दिली. (तालुका प्रतिनिधी)
विदर्भात कापूस व कापड अशी मूल्यवर्र्धित साखळी विकसित करणार
By admin | Updated: August 19, 2016 01:57 IST