वनसडी : देशात स्वच्छ भारत अभियानाचा मोठा गाजावजा सुरू असताना जेथे बाल संस्काराची बीजे रोवली जातात, त्या अंगणवाड्याच स्वच्छतागृहापासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.बाल्याअवस्थेतच संस्काराची जडणघडण होते. आपला पाल्य सुशिक्षित व संस्कारक्षम व्हावा, असे प्रत्येकच पालकाला वाटते. त्यासाठी ते आपल्या पाल्यांना शिक्षण देतात. ग्रामीण भागात अंगणवाडी हेच एकमेव माध्यम बाल्यावस्थेतील विद्यार्थ्यांसाठी असते. जिल्ह्यात आज अनेक अशी गावे आहेत, त्या ठिकाणी अंगणवाड्यात स्वच्छतागृहेच नाहीत. त्यामुळे आपल्या नैसर्गिक गरजा उघड्यावरच पार पाडाव्या लागतात. अस्वच्छतेमुळे या निरागसांना अनेक आजारांनाही सामोरे जावे लागते. या कोवळ्या मनात स्वच्छतेविषयी बालमनापासूनच संस्कार रुजविण्यासाठी प्रत्येक अंगणवाडीत स्वच्छतागृहे बांधण्याची आवश्यकता आहे. स्वातंत्र्याच्या ६ दशकानंतरही अंगणवाड्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. काही ठिकाणी अंगणवाड्याला स्वत:ची इमारतही नाही. त्यामुळे त्यांना एखाद्या मोकळ्या मैदानात किंवा अंगणवाडी सेविकेच्याच घरी ज्ञानाचे धडे गिरवावे लागतात. कॉन्व्हेंट संस्कृतीच्या युगात अंगणवाड्या टिकण्यासाठी त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.या चिमुकल्या विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागण्यासाठी अंगणवाडीत स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे. जेणे करून त्यांच्या मनात स्वच्छतेविषयी जागृती निर्माण होईल. मात्र अद्याप हा विचार प्रशासनाच्या मनाला अद्यापही शिवलेला नाही. त्याचमुळे अनेक अंगणवाड्या स्वच्छतागृहापासून वंचित आहेत. प्रशासनाने अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृह बांधावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर)
जिल्ह्यातील अंगणवाड्या स्वच्छतागृहापासून वंचित
By admin | Updated: November 13, 2014 23:00 IST