चंद्रपूर : केंद्रीय अर्थमंत्री नामदार अरुण जेटली यांनी नुकताच संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अपंग व्यक्तीसाठी कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही. अपंगांच्या साहित्यामध्ये कर सवलतीची घोषणा करण्यात आली. परंतु या व्यतिरिक्त अपंग व्यक्तीचे जीवनमान उंचवण्यासाठी, त्यांना स्वावलंबी करण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्याची गरज असतानाही तसे करण्यात आले नाही. त्यामुळे आज प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.अपंग व्यक्तीना दिव्यांग संबोधण्यात यावे, असे मत पतपंधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात व्यक्त केले होते. परंतु केवळ संबोधण्याच्या नावात बदल करून अपंगांचे जीवनमान उंचावत नाही. जर पंतप्रधान व केंद्र सरकार यांना अपंगाविषयी खरच कळवळा असता तर संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अपंगांच्या मानधनात वाढ करणे, अपंग वित्त व विकास महामंडळ मर्या. साठी आर्थिक तरतुदीमध्ये वाढ करणे आदी निर्णय केंद्र सरकारने घेतले असते. परंतु अपंगाना आर्थिक पाठबळ देणारे कोणतेही निर्णय अर्थसंकल्पनामध्ये नाही. केंद्र सरकारच्या या धोरणाचा प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे जनक आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करण्यात आला. त्यानुसार चंद्रपुरातही आज निदर्शने करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)
जिल्हा कचेरीसमोर अपंगांची निदर्शने
By admin | Updated: March 6, 2016 00:33 IST